

सिडनी : ऑस्ट्रेलियातील ‘युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साऊथ वेल्स’ (यूएनएसडब्ल्यू) मधील संशोधकांनी क्वांटम कॉम्प्युटिंगमध्ये एक महत्त्वपूर्ण शोध लावला आहे. त्यांनी सिलिकॉन चिप्समध्ये अणूच्या केंद्रकांना (अॅटॉमिक न्यूक्लिज) एकमेकांशी ‘संवाद’ साधायला लावले आहे. ही प्रगती मोठ्या प्रमाणावर क्वांटम संगणक (क्वांटम कॉम्प्युटर) तयार करण्याचा मार्ग मोकळा करू शकते.
संशोधकांनी दोन अणूंच्या केंद्रकांचे ‘क्वांटम एंटँगलमेंट’ यशस्वीरित्या तयार केले आहे. क्वांटम एंटँगलमेंट ही अशी स्थिती आहे जिथे दोन कण इतके खोलवर जोडले जातात की, ते स्वतंत्रपणे राहत नाहीत. क्वांटम संगणकांसाठी ही महत्त्वाची गोष्ट ठरते. अणूच्या केंद्रकामध्ये क्वांटम माहिती साठवली जाते. ती बाहेरील गोंधळापासून सुरक्षित असते. आतापर्यंत, अनेक केंद्रकांना एकाच इलेक्ट्रॉनच्या मदतीने जोडले जाई. परंतु, यामुळे नियंत्रण करणे अवघड होते. या नवीन शोधात, दोन वेगळ्या इलेक्ट्रॉनच्या मदतीने दोन केंद्रकांना जोडण्यात आले आहे. इलेक्ट्रॉन ‘टेलिफोन’ सारखे काम करतात. हे तंत्रज्ञान सध्याच्या सिलिकॉन चिप्स बनवण्याच्या प्रक्रियेशी सुसंगत आहे. याचा अर्थ, अब्जावधी डॉलर्सच्या सेमीकंडक्टर उद्योगाने विकसित केलेल्या उत्पादन प्रक्रियेचा वापर क्वांटम संगणक तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो.
संवादाचे अंतर
संशोधकांनी दोन अणूंच्या केंद्रकांना सुमारे 20 नॅनोमीटरच्या अंतरावरून संवाद साधायला लावले. हे अंतर कमी वाटत असले तरी, जर आपण अणू केंद्रकाला मानवाच्या आकाराएवढे मोठे मानले, तर हे अंतर सिडनी ते बोस्टन या शहरांमधील अंतराएवढे असेल. ही प्रगती क्वांटम संगणकाच्या निर्मितीतील एक मोठा अडथळा दूर करते, ज्यामुळे भविष्यकाळात अधिक शक्तिशाली आणि कार्यक्षम क्वांटम संगणक बनवणे शक्य होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.