

लॉस एंजलिस : एलएचएस ११४०बी असे नाव असलेला हा बाह्यग्रह पृथ्वीच्या तुलनेत सुमारे पाच पट मोठा असून, तो एक सुपर अर्थ आहे. हा ग्रह त्याच्या ताऱ्याच्या गोल्डीलॉक्स झोन किंवा राहण्यायोग्य क्षेत्रात परिभ्रमण करतो. याचाच अर्थ, या ग्रहाचे तापमान द्रव स्वरूपात पाणी टिकून राहण्यासाठी अगदी अनुकूल आहे. ते खूप गरमही नाही आणि खूप थंडही नाही.
१६ जुलै रोजी ‘सायन्स’ जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या शोधनिबंधाचे प्रमुख लेखक आणि ग्रहशास्त्रज्ञ कॉलिन चेरुबिम यांनी सांगितले की, या ग्रहाचे वस्तुमान आणि त्रिज्येवरून मिळालेल्या घनतेच्या अंदाजानुसार, हा प्रामुख्याने एक खडकाळ ग्रह असावा. याची रचना पृथ्वीशी मिळतीजुळती असून, यात लोखंडाचा गाभा आणि सिलिकेटचे आवरण असू शकते. तसेच यात पाण्याचा अंश आणि आता आपल्याला समजल्याप्रमाणे एक वातावरणदेखील असण्याची शक्यता आहे.
१९९० च्या दशकात पहिल्या बाह्यग्रहाचा शोध लागल्यापासून खगोलशास्त्रज्ञांनी आतापर्यंत ६,२०० हून अधिक बाह्यग्रह शोधले आहेत. पुढील निरीक्षणांमध्ये या निष्कर्षांची पुष्टी झाल्यास, दुसऱ्या ताऱ्याच्या हॅबिटेबल झोनमध्ये असलेल्या खडकाळ ग्रहावर वातावरण शोधण्याची एलएचएस ११४०बी ही पहिलीच वेळ ठरेल. सध्या या ग्रहावर जीवसृष्टी असल्याचा थेट पुरावा नाही; पण चेरुबिम यांच्या मते, परग्रहावरील जीवसृष्टी शोधण्यासाठी हा एक प्रबळ उमेदवार आहे. सौरमालेबाहेर जीवसृष्टी शोधण्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे, असे ते म्हणाले.
पुढील संशोधनाची गरज
मॅसॅच्युसेटस् इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील संशोधक आना ग्लिडेन आणि अॅस्ट्रोबायोलॉजीचे संशोधन संचालक मायकेल गिलन यांनी या शोधाचे स्वागत केले असले, तरी दुसऱ्यांदा हेलियम न आढळल्याने अधिक सखोल निरीक्षणाची गरज व्यक्त केली आहे. जर या शोधावर शिक्कामोर्तब झाले, तर कोट्यवधी वर्षांपासून आपले वातावरण टिकवून ठेवणारा हा ‘सुपर-अर्थ’ जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपसारख्या भविष्यातील मोहिमांसाठी केंद्र बनेल.