

त्रिशूर : भारतात अनेक सुंदर धबधबे आहेत, जे पाहणे पर्यटकांसाठी एक स्वप्न असते. असाच एक धबधबा आहे ज्याला ‘भारताचा नायगारा’ म्हणून ओळखले जाते. केरळमधील अथिराप्पिल्ली धबधबा हे अतिशय सुंदर ठिकाण आहे. याला ‘नायगारा ऑफ इंडिया’ म्हणण्यामागे खास कारण आहे. याचा रुंद विस्तारलेला जलप्रवाह, टोकदार कडा आणि वरून खाली कोसळणार्या पाण्याची मोठी मात्रा एका विशाल पडद्यासारखी दिसते. हे द़ृश्य अगदी अमेरिका-कॅनडा सीमेवरील जगप्रसिद्ध नायगारा फॉल्ससारखेच भासते.
हा धबधबा केरळच्या त्रिशूर जिल्ह्यात, घनदाट जंगल आणि पश्चिम घाटातील शोलायर पर्वतरांगेच्या मध्यभागी वसलेला आहे. हा संपूर्ण परिसर हिरवीगार निसर्गरम्यता, वाहणार्या नद्या आणि समृद्ध वन्यजीवनामुळे खूप सुंदर मानला जातो. विशेषतः पावसाळ्यामध्ये जेव्हा पाण्याचा प्रवाह कित्येक पटीने वाढतो, तेव्हा अथिराप्पिल्ली धबधबा अधिक रुंद आणि प्रचंड दिसतो. त्याची रुंदी आणि अर्ध-वर्तुळाकार (अर्ध-गोलाकार) स्वरूप त्याला नायगारा फॉल्ससारखा लुक देतात. या कोसळणार्या पाण्याचा जोरदार आवाज जगातील सर्वात मोठ्या धबधब्यांप्रमाणे घुमतो, ज्यामुळे हे द़ृश्य खरोखरच पाहण्यासारखे असते.
अथिराप्पिल्ली धबधबा 80 फूट उंच आहे आणि त्याची रुंदी खूप मोठी आहे. दूरून पाहिल्यास तो खाली कोसळणार्या पांढर्या पाण्याची एक विशाल चादर असल्यासारखा दिसतो. पावसाळ्यात त्याचा जलप्रवाह सर्वाधिक असतो आणि तो भारतातील सर्वात शक्तिशाली धबधब्यांच्या यादीत अग्रस्थानी येतो. हा धबधबा बॉलीवूड आणि साऊथच्या मोठ्या चित्रपटांसाठी सर्वात आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे. ‘बाहुबली’, ‘दिल से’, ‘रावण’, ‘गुरू’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटांतील प्रसिद्ध द़ृश्ये येथे चित्रित करण्यात आली आहेत.
यामुळे त्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रियता मिळाली आहे. अथिराप्पिल्ली धबधबा हा युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेल्या पश्चिम घाट वर्षावनात स्थित आहे. हा परिसर दुर्मीळ वृक्ष, अनोखे जीवजंतू आणि सदाहरित जंगलांसाठी प्रसिद्ध आहे. या धबधब्याच्या आसपासचे जंगल केरळचा राज्य पक्षी असलेल्या ग्रेट इंडियन हॉर्नबिलचे घर आहे. त्यामुळे हा परिसर पक्षीप्रेमी आणि वन्यजीव छायाचित्रकारांसाठी अत्यंत खास आहे.