

वॉशिंग्टन : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ पुन्हा एकदा मानवाला चंद्रावर उतरवण्याची तयारी करत आहे. ‘नासा’चे आर्टेमिस मिशन फेब्रुवारी 2026 मध्ये लॉन्च होऊ शकते. जगभरातील देश चंद्रावर परत जाण्याची योजना आखत आहेत. पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह असलेल्या चंद्राचे मानवाच्या द़ृष्टीने बरेच महत्त्व आहे. मात्र, हा चांदोमामा पृथ्वीच्या आणखी जवळ आला तर? त्याचे पृथ्वीपासूनचे योग्य अंतरच आपल्यासाठी योग्य आहे, तो आणखी जवळ आल्यास विनाश होऊ शकतो, असे संशोधक सांगतात.
चंद्र पृथ्वीवर जीवन टिकवून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. त्याचे गुरुत्वाकर्षणीय आकर्षण पृथ्वीच्या हवामानाला स्थिर ठेवण्यास मदत करते. चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल पृथ्वीचा अक्षीय कल स्थिर ठेवते. या स्थिरतेमुळेच पृथ्वीवर दीर्घकाळ स्थिर हवामान राहते आणि हंगामी बदल देखील नियमितपणे होतात. चंद्राशिवाय पृथ्वीचा अक्षीय कल अनियमितपणे डळमळेल. यामुळे अति टोकाचे हवामान बदल होतील, जे पर्यावरण प्रणालीला उद्ध्वस्त करू शकतात आणि जीवन टिकवून ठेवणे अत्यंत कठीण करतील.
चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या पाण्यावर जोर लावून समुद्रात भरती-ओहोटी निर्माण करते. या भरती-ओहोटी सागरी थरांना मिसळून पोषक तत्त्वांचे वितरण करतात आणि पाण्याला ऑक्सिजन पुरवतात, ज्यामुळे सागरी जीवनासाठी आवश्यक संतुलन राखले जाते. प्रवाळ आणि स्थलांतरित पक्ष्यांसारखे सागरी आधारावर जगणारे काही जीव त्यांचे प्रजनन चक्र चंद्राच्या कलांशी जोडतात, जे चंद्राचा जैविक प्रभाव दर्शवते.
चंद्र पृथ्वीपासून 3,84,400 किलोमीटर दूर आहे आणि हे अंतर अगदी योग्य आहे. जर चंद्र किंचितही जवळ आला, तर भरतीचे बल खूप वाढेल. यामुळे अतिविशाल भरती-ओहोटी येतील, ज्यामुळे किनारी भागांमध्ये नियमितपणे पूर येतील. तसेच, पृथ्वीच्या फिरण्याची गती हळू होईल. जर चंद्र अधिक दूर गेला, तर भरती-ओहोटी कमजोर होईल. यामुळे सागरी पाण्याचे अभिसरण थांबेल आणि सागरी जीवनाचे मोठे नुकसान होईल.