

वॉशिंग्टन : खगोलशास्त्रज्ञांनी आकाशगंगेच्या अगदी कडेला लपलेला, आजवर पाहिलेला ’सर्वात शुद्ध’ तारा (Most Pristine Star) शोधून काढला असण्याची शक्यता आहे. हा असामान्य तारा, जो विश्वातील पहिल्या तार्यांपैकी एकाचा वंशज असू शकतो, धातूंच्या बाबतीत इतका दरिद्री आहे की, तो तारा निर्मितीच्या एका महत्त्वाच्या नियमाला छेद देतो.
सर्व ज्ञात तारे आण्विक संमीलन (Nuclear Fusion) प्रक्रियेद्वारे ऊर्जा मिळवतात. यात कमी वजनाचे अणू प्रचंड दाबाखाली एकत्र येऊन जड मूलतत्त्वे बनवतात आणि ऊर्जा उत्सर्जित करतात. तार्यांमध्ये सर्वाधिक आढळणारे घटक हायड्रोजन आणि हेलियम आहेत. मात्र, तार्यांच्या केंद्रस्थानी कार्बन, ऑक्सिजन आणि लोह यांसारखी संमीलित मूलतत्त्वेही आढळतात. लोह हा तार्यांमध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळणारा धातू आहे. सोनं, तांबं आणि युरेनियम यासारखे जड धातू मरणाच्या वाटेवर असलेले तारे सुपरनोव्हा स्फोटातून निर्माण करतात आणि ते देखील बहुतांश तार्यांमध्ये आढळतात. ज्या तार्यांमध्ये जड मूलतत्त्वे किंवा धातूंचे प्रमाण कमी असते, त्यांना ‘शुद्ध’ (Pristine) तारे म्हटले जाते.
खगोलशास्त्रज्ञांना अशा तार्यांची खूप मागणी असते, कारण ते विश्वातील पहिल्या तार्यांसारखे असतात, जे अजूनपर्यंत थेट पाहिले गेलेले नाहीत. ’ SDSS J0715-7334’ नावाच्या या नव्या तार्याचा शोध लागला असून, प्रीप्रिंट सर्व्हर arXiv वर अपलोड केलेल्या एका नवीन अभ्यासात संशोधकांच्या गटाने ही माहिती उघड केली आहे. युरोपीयन स्पेस एजन्सीच्या (ESA) गाया स्पेस दुर्बिणीने गोळा केलेल्या डेटामधून तारे शोधणार्या MINESweeper कार्यक्रमाचा वापर करून हा तारा शोधण्यात आला. हा नवीन तारा सूर्यमालेतील सूर्यापेक्षा सुमारे 30 पट अधिक मोठा असलेला ‘रेड जायंट’ आहे.
तार्याच्या प्रकाशाच्या स्पेक्ट्रोग्राफच्या प्राथमिक विश्लेषणानुसार, हा तारा मागील सर्वात कमी धातू असलेला तार्यापेक्षा जवळपास दुप्पट शुद्ध आहे. तसेच, यात आजपर्यंत पाहिलेल्या सर्वात कमी लोह असलेल्या तार्यापेक्षाही 10 पट कमी धातू आहे. यामुळे सर्वात कमी एकूण धातू आणि सर्वात कमी लोह या दोन्ही नोंदी या नवीन तार्याच्या नावावर झाल्या आहेत, असे संशोधकांनी लिहिले आहे. हा तारा इतका खास असण्याचे कारण म्हणजे, यात कार्बनचे प्रमाणही खूप कमी आहे. यापूर्वीच्या बहुतांश लोह-दरिद्री तार्यांमध्ये कार्बनचे प्रमाण तुलनेने जास्त होते. (कार्बन धातू नसला तरी त्याची गणना धातूंमध्ये केली जाते.) या कार्बनमुळेच त्या तार्यांची एकूण धातूची पातळी जास्त राहिली होती. मात्र, J0715-7334 मध्ये कार्बनही कमी असल्याने, तो खर्या अर्थाने ‘सर्वात शुद्ध’ तारा ठरतो आणि यामुळेच तो तारा निर्मितीच्या प्रचलित नियमांला धक्का देतो. संशोधकांच्या मते, J0715-7334 तारा पृथ्वीपासून सुमारे 85,000 प्रकाशवर्षे दूर आहे. जरी हा तारा आकाशगंगेच्या अगदी आत असला तरी, त्याच्या कोनीय गतीमुळे तो मूळचा आकाशगंगेचा नसावा असा अंदाज आहे.