Space Discovery : आकाशगंगेबाहेर आढळला ताऱ्यांचा अद्‌भुत प्रवाह

‘डार्क मॅटर’चे रहस्य उलगडणार?
Space Discovery
आकाशगंगेबाहेर आढळला ताऱ्यांचा अद्‌भुत प्रवाह
Published on
Updated on

वॉशिंग्टन : हबल स्पेस टेलिस्कोपच्या जुन्या डेटाचा अभ्यास करताना संशोधकांनी पृथ्वीपासून सुमारे ११.५ कोटी प्रकाशवर्षे दूर असलेल्या ‘यूजीसी ९०५०-डीडब्ल्यू१’ या आकाशगंगेत ताऱ्यांचा एक अत्यंत धूसर प्रवाह शोधून काढला आहे. आपल्या आकाशगंगेबाहेर (मिल्की वे) अशा प्रकारचा ‘ग्लोब्युलर क्लस्टर स्टेलर स्ट्रीम’ सापडण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. हा शोध ‘नेचर’ या जगप्रसिद्ध विज्ञान पत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे.

हा ताऱ्यांचा प्रवाह म्हणजे एका दाट ताऱ्यांच्या समूहाचे अवशेष आहेत, ज्याला त्याच्या मूळ आकाशगंगेच्या गुरुत्वाकर्षणामुळे हळूहळू खेचून विखुरले गेले आहे. या प्रवाहाच्या आकार आणि गतीचा अभ्यास करून शास्त्रज्ञांना त्या आकाशगंगेचे एकूण वस्तुमान, दृश्य घटक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यातील ‘डार्क मॅटर’चे (कृष्णद्रव्य) प्रमाण मोजणे शक्य झाले आहे.

विश्वनिर्मितीमध्ये सुमारे ८०% ते ८५% भाग डार्क मॅटरचा मानला जातो. परंतु, ते अदृश्य असल्याने त्याचे स्वरूप आजही विज्ञानासाठी मोठे गूढ आहे. आतापर्यंत शास्त्रज्ञ केवळ मिल्की वे मधील डार्क मॅटरचा नकाशा तयार करण्यासाठी अशा ताऱ्यांच्या प्रवाहाचा वापर करत होते; मात्र आता इतर आकाशगंगांमधील अदृश्य विश्वाचा वेध घेणे शक्य होणार आहे.

संशोधकांच्या मते, ही अतिविस्तृत आणि धूसर आकाशगंगा असल्यामुळे हा सूक्ष्म प्रवाह ओळखणे शक्य झाले. आगामी काळात येणाऱ्या ‘नॅन्सी ग्रेस रोमन स्पेस टेलिस्कोप’सारख्या आधुनिक दुर्बिणींमुळे अशा प्रकारच्या अनेक ताऱ्यांच्या शृंखलांचा शोध घेणे सोपे होईल. परिणामी, दीर्घिकांची निर्मिती, उत्क्रांती आणि डार्क मॅटरच्या अस्तित्वाबद्दल सुरू असणाऱ्या मूलभूत संशोधनाला प्रचंड गती मिळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news