

बीजिंग : हे जग आश्चर्यांनी भरलेले आहे. अनेकदा अशा काही घटना घडतात, ज्यावर विश्वास ठेवणे कठीण होते. चीनमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे, जिथे एका मुलीचा फोटो सरकारी चलनी नोटेवर छापला गेला; पण ती मुलगी नेमकी कोण आहे, हे जगाला तब्बल 50 वर्षांनंतर समजले. ‘शाई नियान’ असे या महिलेचे नाव असून, तिला संपूर्ण चीनमध्ये ‘वन युआन गर्ल’ म्हणून ओळखले जाते.
ही गोष्ट आहे जेव्हा शाई नियान केवळ 16 वर्षांची होती. ती आपल्या मैत्रिणींसोबत गावातील बाजारात गेली होती. तिने ‘डोंग’ या अल्पसंख्याक समुदायाचे पारंपरिक कपडे आणि कानात चांदीच्या मोठ्या बाळ्या घातल्या होत्या. एका दुकानात वस्तू पाहत असताना अचानक एका अनोळखी व्यक्तीने तिचा हात पकडला. शाई थोडी घाबरली; पण त्याच वेळी तिच्या चेहर्यावर एक स्मितहास्य आले. त्या व्यक्तीने (जो एक चित्रकार होता) तिथेच तिचे रेखाचित्र काढले. शाई या घटनेला पूर्णपणे विसरून गेली होती.
चीन सरकारने 1988 मध्ये ‘एक युआन’ची नवीन नोट जारी केली. या नोटेवर दोन महिलांचे फोटो होते - एक डोंग समुदायातील आणि दुसरी याओ समुदायातील. जेव्हा ही नोट चलनात आली, तेव्हा लोकांनी चर्चा सुरू केली की, नोटेवरील मुलगी अगदी शाई सारखी दिसते. मात्र, स्वतः शाईला याची खात्री नव्हती. 2010 मध्ये सरकारी अधिकार्यांनी अधिकृतपणे पुष्टी केली की, नोटेवरील चेहरा शाई नियानचाच आहे. 2017 मध्ये किंगयुन टाऊनच्या अधिकार्यांनी सांगितले की, तिच्या केसांची रचना आणि शैलीवरून ती त्यांच्याच भागातील असल्याचे स्पष्ट होते. शाई नियानचे आयुष्य अत्यंत साधे राहिले आहे.
ती एका शेतकरी कुटुंबातील असून, सहा भावंडांमध्ये सर्वात मोठी होती. लहानपणापासूनच ती कुटुंबाला कामात मदत करायची. गावात तिला ‘विलेज फ्लॉवर’ म्हणून ओळखले जायचे. 23 व्या वर्षी तिचे लग्न झाले आणि तिला एक मुलगा व एक मुलगी आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, आपल्या चेहर्याचा वापर नोटेवर झाला आहे हे समजून तिला विशेष आनंद झाला नाही किंवा तिने या प्रसिद्धीचा वापर करून सरकारकडे कधीही कोणतीही मदत मागितली नाही. आजही ती आपले आयुष्य एका सामान्य शेतकर्याप्रमाणे व्यतीत करत आहे.