

रिओेे डी जानेरिओ ः ‘पृथ्वीचे फुफ्फुस’ असे म्हटल्या जाणार्या अॅमेझॉनच्या जंगलाची व्याप्ती अनेक देशांमध्ये पसरलेली आहे. दक्षिण अमेरिका खंडातील अॅमेझॉन नदी म्हणजे पृथ्वीवरील जैवविविधतेचे एक संग्रहालयच आहे. हजारो किलोमीटर्स उत्तर-पूर्व दिशानी वाहत जाणार्या अॅमेझॉनने लक्षावधी चौ. कि.मी.चा प्रदेश व्यापलेला आहे. विषुववृत्तीय प्रदेश असल्याने पावसाचे, उन्हाचे प्रमाण जबरदस्त आहे. या दोन प्रमुख कारणांमुळेच अॅमेझॉनच्या परिसरातील जैवविविधता संशोधकांना सततचे आव्हान ठरले आहे.
अॅमेझॉनच्या परिसरात अनेक ठिकाणी टेपूईस हा भौगोलिक प्रकार आढळतो. दाट जंगलांच्या सपाट प्रदेशातून पाच-सात हजार फूट उंचीचे प्रशस्त परिसराचे टेबललँड (सपाट प्रदेश) मधूनच वर उंचावलेले असतात. सर्व बाजूंनी कातळ, सरळ उभे असे ताशीव कडे असतात. सँडस्टोनने बनलेल्या या कातळांच्या माथ्यावर दाट जंगले असतात. आजुबाजूच्या प्रदेशातून कातळांमधील वेगवेगळे आडवे पट्टे स्पष्टपणे ओळखता येतात. उत्तुंग कड्यांच्या सभोवताली मैलोन्मैल दाट जंगले असतात. उत्तुंग कड्यांना वरती सपाट भाग असतो. नेहमीप्रमाणे टोकदार सुळके नसतात. अशा प्रकारच्या ‘टिपूईस’ प्रदेशातील वनस्पती आणि प्राणीसृष्टीवर आणि त्यांच्यात घडलेल्या उत्क्रांतीवर टेक्सास विद्यापीठातील प्राध्यापिका पॅट्रिशिआ सालेरनो आणि डॉ. जोस मॅकडोरमिंट यांच्या तुकडीने प्रचंड संशोधन केलेले आहे. त्या वैशिष्ट्यपूर्ण प्रदेशात आढळणारे सरडे आणि झाडांवरील बेडूक यांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात नवीन माहिती उजेडात आलेली आहे. अर्थातच त्या प्रदेशात आढळणारे सरडे, बेडूक पृथ्वीवर इतरत्र कोठेही आढळून येत नाहीत. अशा ट्री फ— ॉग्ज आणि सरड्यांच्या उपप्रकारात गेल्या एक लक्ष वर्षांच्या कालखंडात उत्क्रांती घडत गेली, असे त्यांच्या संशोधनानुसार सिद्ध झाले आहे.
तळाच्या भागातील दाट जंगलात वास्तव्य करणारे बेडूक, सरडे शेकडो मीटर्सचे उभे कडे चढून वरच्या सपाट प्रदेशात कसे पोहोचले असतील, कशाप्रकारे स्थिरावले असतील आणि त्यांच्यात उत्क्रांती घडते ते त्या प्रदेशात कायम झाले. या टप्प्याला त्यांच्या संशोधनात खूपच प्रयास करावे लागले. त्या कड्यांच्या काही भागात गवत आणि झिरपणारे पाणी जंगलांच्या प्रदेशात भरपूर पाऊस आणि वातावरणातील आर्द्रता या घटकांचा उपयोग होऊन ते सजीवपर्यंत पोहोचले असावेत, असा संशोधकांचा कयास आहे. जीवाश्मांच्या आणि उपलब्ध झालेल्या डीएनएचा आधार घेऊन ते सजीव साधारणत: सात लक्ष वर्षांपूर्वी तेथे पोहोचले असावेत. आश्चर्य म्हणजे त्या प्रदेशात वरच्या सपाट टेबललँड, बाजूच्या सुळक्यांच्या वेगवेगळ्या उंचीवर चार वेगळ्या प्रजातींचे वृक्ष बेडूक (ट्री फ— ॉग्ज) आढळून आलेले आहेत. या बदलांवर मात्र त्या संशोधकांना समाधानकारक उत्तर मिळालेले नाही.