

वॉशिंग्टन : सध्या जगभरातील खगोलशास्त्रज्ञ पृथ्वीच्या दिशेने प्रवास करीत असलेल्या एका लघुग्रहाबाबत चिंतेत आहेत. या लघुग्रहाचे नाव ‘2024 वायआर 4’ असे आहे. आधी संशोधकांनी अनुमान लावले होते की, हा लघुग्रह पृथ्वीला धडकण्याची शक्यता सुमारे 1 टक्का आहे. मात्र, आता हा धोका वाढून तो 2.3 टक्के झाल्याचे संशोधक म्हणत आहेत. सर्वात जास्त त्रस्त करणारी बाब म्हणजे या लघुग्रहाचा वास्तविक आकार किती आहे व त्याचा वेग किती आहे, याची अजूनही नेमकी माहिती समजलेली नाही. सध्या संशोधकांनी हा लघुग्रह कोणत्या मार्गाने पृथ्वीजवळून जाऊ शकतो, याचा अभ्यास करण्यास सुरुवात केली आहे. या मार्गात भारत, पाकिस्तान, बांगला देश यांसारख्या देशांचाही समावेश आहे. हा लघुग्रह धडकलाच तर एखाद्या मोठ्या शहराइतका भाग उद्ध्वस्त होऊ शकतो.
वैज्ञानिकांचे अनुमान आहे की, हा लघुग्रह 200 मीटरपर्यंत आकाराचा असू शकतो. संशोधकांनी लघुग्रहाच्या संभाव्य प्रभावाखाली येणार्या क्षेत्रांची ओळख करणे सुरू केले आहे, जेणेकरून धडकेपूर्वीच तेथील लोकांना सुरक्षित स्थळी हलवता येईल. डिसेंबर 2032 मध्ये हा लघुग्रह पृथ्वीजवळून जाणार आहे. तत्पूर्वीच त्याच्याविषयी जितकी माहिती मिळवता येईल, तितकी मिळवण्याचे काम सध्या सुरू आहे. हा लघुग्रह पृथ्वीला धडकल्यास 500 अणुबॉम्बपेक्षाही अधिक ऊर्जा निर्माण होऊ शकते. त्यावरूनच त्याच्यामुळे होणार्या विनाशाचा अंदाज येऊ शकतो. ‘नासा’च्या कॅटालिना स्काय सर्व्हे प्रोजेक्टचे इंजिनिअर डेव्हिड रँकिन यांनी अमेरिकेपासून प्रशांत महासागर, दक्षिण आशिया, अरबी समुद्र आणि उप-सहारा आफ्रिकेच्या काही भागांपर्यंतच्या भागाची सध्या ओळख केली आहे.
ज्या देशांना हा लघुग्रह धडकण्याची सर्वाधिक शक्यता आहे त्यामध्ये भारत, पाकिस्तान, बांगला देश, इथिओपिया, सुदान, नायजेरिया, व्हेनेझुएला, कोलंबिया आणि इक्वेडोरचा समावेश होतो. अर्थात, हा लघुग्रह पृथ्वीला धडकण्याची शक्यता अतिशय कमी असली, तरी 2.3 टक्के शक्यताही धोक्याची घंटी वाजवण्यासाठी पुरेशी आहे. या लघुग्रहाचा शोध गेल्याच वर्षी डिसेंबरमध्ये घेण्यात आला होता. त्यानंतर नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सीच्या वैज्ञानिकांसाठी हा मोठाच मुद्दा बनला. त्याला अतिशय धोकादायक श्रेणीत वर्गीकृत करण्यात आले आहे. त्याच्या संभाव्य धोक्याचा विचार करून त्याला टोरिनो स्केलवर तीन रेटिंग दिली आहे. टोरिनो स्केल पृथ्वीजवळील धोक्याचे मोजमाप करतो. यापूर्वी ‘99942 अपोफिस’ या लघुग्रहानेही अशीच भीती निर्माण केली होती. सध्या येत असलेल्या लघुग्रहाचा व्यास सैबेरियातील तुंगुस्कामध्ये धडकलेल्या लघुग्रहाइतकाच आहे. या धडकेने सुमारे दोन हजार चौरस किलोमीटरचे जंगल नष्ट झाले होते. आताचा लघुग्रह 22 डिसेंबर 2032 या दिवशी पृथ्वीपासून सुमारे 1 लाख 6 हजार किलोमीटर अंतरावरून जाईल, असे अनुमान आहे. अवकाशीय अंतराचा विचार करता, हे अंतर जास्त नाही.