

मेक्सिको सिटी : सुमारे ६.६ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर एक भीषण अपघात घडला होता, ज्याने जगाचा इतिहास कायमचा बदलून टाकला. एका महाकाय लघुग्रहाने पृथ्वीला जोरदार धडक दिली आणि तत्कालीन जगावर राज्य करणाऱ्या अवाढव्य डायनासोरसह पृथ्वीवरील ७५ टक्के प्रजाती नष्ट झाल्या. हा लघुग्रह नेमका कशाचा बनला होता आणि अंतराळाच्या कोणत्या कोपऱ्यातून आला होता, याचा शोध वैज्ञानिक अनेक वर्षांपासून घेत होते. आता युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबिया, पॅरिस, ब्रुसेल्स आणि व्हिएन्ना येथील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांच्या पथकाने या रहस्यावरून पडदा उचलला आहे. वैज्ञानिकांनी मातीच्या एका पातळ थरात आढळलेल्या निकेल आयसोटोप्सचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे. हा थर ‘क्रिटेशिअस-पॅलिओजीन’ (K-Pg) आघाताचा साक्षीदार आहे.
या संशोधनात असे दिसून आले आहे की, पृथ्वीवर धडकलेला लघुग्रह कोणतीही सामान्य खडकाची तुकडी नव्हती, तर तो ‘CO कॉन्ड्राईट’ (CO Chondrite) नावाचा एक अत्यंत दुर्मीळ कार्बनयुक्त लघुग्रह होता. संपूर्ण पृथ्वीवर आढळणाऱ्या एकूण उल्कांमध्ये या प्रकारच्या उल्कांचे प्रमाण केवळ ५ टक्केच आहे. सूर्यमालेतील सर्वात जुन्या आणि मूळ स्वरूपात राहिलेल्या खडकांपैकी हा एक मानला जातो. संशोधकांच्या मते, सुमारे १० किलोमीटर रुंद असलेला हा महाकाय लघुग्रह आपल्या सूर्यमालेच्या बाह्य भागातून आला होता. गुरू ग्रहाजवळ असलेल्या बाह्य लघुग्रह पट्ट्यातून किंवा अंतराळातील एखाद्या दूरवरच्या ढिगाऱ्यातून आपली कक्षा चुकून तो थेट पृथ्वीच्या दिशेने आला असावा.
मेक्सिकोच्या युकाटन द्वीपकल्पावर जेव्हा हा लघुग्रह कोसळला, तेव्हा तेथे १८० किलोमीटर रुंदीचे 'चिक्सुलब क्रेटर' तयार झाले. या आघातामुळे निर्माण झालेले भीषण भूकंप, त्सुनामी आणि जंगलांमधील वणव्यांमुळे संपूर्ण जग धुराने झाकले गेले होते. आतापर्यंत मानले जात होते की उल्केमध्ये असलेल्या सल्फरने (गंधक) वायूचे रूप घेऊन वातावरण विषारी बनवले होते. मात्र, या नवीन शोधाने त्या जुन्या सिद्धांताला थोडे बदलले आहे. CO कॉन्ड्राईट प्रकारच्या खडकांमध्ये कार्बन, जस्त (Zinc), पाणी आणि विशेषतः गंधक यांसारखे घटक अतिशय कमी प्रमाणात असतात. वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की डायनासोरच्या विनाशाचे मुख्य कारण गंधक वायू नसून, आघातानंतर हवेत आणि अंतराळात उडालेला अब्जावधी टन बारीक कचरा आणि धुळीचे लोट हे होते. जेव्हा ही दुर्मीळ उल्का धडकली, तेव्हा त्यातून निघालेल्या धुळीने आणि बारीक कचऱ्याने पृथ्वीच्या संपूर्ण वातावरणाला एका जाड चादरीसारखे झाकून टाकले. यामुळे सूर्याचा प्रकाश कित्येक वर्षे जमिनीपर्यंत पोहोचू शकला नाही. सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे वनस्पती नष्ट झाल्या, ज्यामुळे संपूर्ण अन्नसाखळीच कोलमडली. पृथ्वीचे तापमान झपाट्याने घसरले आणि भीषण हवामान बदल घडला. वैज्ञानिकांच्या मते, हा शोध हे सिद्ध करतो की आपली पृथ्वी अंतराळातील एका अत्यंत दुर्मीळ आणि असाधारण घटनेची शिकार झाली होती, ज्याने पुढे जाऊन मानवी जीवनाच्या विकासाचा मार्ग मोकळा केला.