

वॉशिंग्टन : ‘अॅस्टेरॉईड 2024 वायआर 4’ पृथ्वीला धडकण्याची शक्यता वर्तवली जात होती, त्यामुळे अनेक आठवडे जगभरात चिंता निर्माण झाली होती. मात्र, आता ‘नासा’ने अधिकृत स्पष्टीकरण देत सांगितले की, पृथ्वीवर या लघुग्रहाचा कोणताही परिणाम होणार नाही. मंगळवारी नासाने अधिकृत निवेदन प्रसिद्ध करत सांगितले की, हा लघुग्रह 2023 मध्ये पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार असला, तरी तो थेट धडकण्याची शक्यता नाही. नासाच्या सेंटर फॉर नियर अर्थ ऑब्जेक्ट स्टडीजचे प्रमुख पॉल चोडास यांनी सांगितले, ‘हीच ती अपेक्षित बातमी होती.’ तथापि, नासाने इशारा दिला आहे की, जरी पृथ्वीला धोका नसला तरीही चंद्रासाठी हा लघुग्रह घातक ठरू शकतो. लघुग्रहाचा मार्ग पाहता, तो चंद्राच्या अत्यंत जवळ जाऊ शकतो किंवा धडकण्याची शक्यताही नाकारता येत नाही. शास्त्रज्ञ सध्या या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहेत.
‘2024 वायआर 4’ सारखे लघुग्रह अभ्यासासाठी महत्त्वाचे मानले जातात. कारण, ते सौरमंडळाच्या निर्मितीविषयी तसेच भविष्यातील संभाव्य धोक्यांबाबत महत्त्वपूर्ण माहिती देऊ शकतात. त्यामुळे या घटनेचा पुढील काळात सखोल अभ्यास केला जाणार आहे. नासाच्या मते, जर हा लघुग्रह पृथ्वीवर आदळला असता, तर 8 मेगाटन टीएनटीच्या समकक्ष एक महाभयंकर स्फोट झाला असता. हा स्फोट हिरोशिमा वर टाकलेल्या अणुबॉम्बच्या 500 पट अधिक शक्तिशाली असता. यामुळे संपूर्ण शहर नष्ट होऊ शकले असते आणि आसपासच्या भागावरही त्याचा गंभीर परिणाम झाला असता. मात्र, आता पृथ्वीवरील लोक सुटकेचा श्वास घेऊ शकतात. कारण, नासाने स्पष्ट केले आहे की, हा लघुग्रह आता पृथ्वीवर आदळणार नाही. परंतु, यामुळे चंद्रावर मात्र गंभीर धोका निर्माण झाला आहे. नासाच्या गणनेनुसार, ‘2024 वाय आर 4’ थेट चंद्राच्या दिशेने जात आहे आणि त्याची टक्कर होण्याची शक्यता 1.7% आहे. ही शक्यता पूर्वीच्या अंदाजांपेक्षा अधिक आहे.
पृथ्वीच्या विपरीत, चंद्राला कोणतेही वायुमंडळ नाही. त्यामुळे हा लघुग्रह त्याला रोखू शकणार नाही. जर ‘2024 वायआर 4’ चंद्रावर आदळला, तर त्यावेळी त्याचा वेग 30,000 मैल प्रति तास इतका असेल. या भीषण धडकेमुळे 6,500 फूट व्यासाचा एक प्रचंड खड्डा चंद्राच्या पृष्ठभागावर निर्माण होईल.