Snakebite Treatment | सर्पविषावरील सार्वत्रिक औषधासाठी 800 वेळा सर्पदंश झालेल्याची मदत

Snakebite Treatment
Snakebite Treatment | सर्पविषावरील सार्वत्रिक औषधासाठी 800 वेळा सर्पदंश झालेल्याची मदतPudhari File Photo
Published on
Updated on

वॉशिंग्टन : जेव्हा जेकब ग्लॅनविले पहिल्यांदा टीम फ्रीडे यांच्याशी बोलले, तेव्हा ते म्हणाले, ‘मला तुमच्या रक्ताचा काही नमुना मिळाला तर आवडेल.’ जैविक तंत्रज्ञान कंपनी सेंटिव्हॅक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले ग्लॅनविले हे सर्पदंशावर एक ‘युनिव्हर्सल’ (सार्वत्रिक) उपचार विकसित करत होते आणि फ्रीडे हे स्वतःहून शिकलेले एक सर्पविज्ञानी आहेत, ज्यांना जगातील काही सर्वात विषारी सापांच्या विषापासून ‘अति-प्रतिरक्षा’ (हायपर इम्युनिटी) प्राप्त आहे. गेल्या दोन दशकांत, फ्रीडे यांना कोब्रा (नाग), तायपान, ब्लॅक मंबा, रॅटलर्स आणि इतर अनेक सापांनी 800 हून अधिक वेळा सर्पदंश केला आहे. त्यांनी ‘स्वत:हून रोगप्रतिकार’ (self- immunizations) करून घेतले आहे. हळूहळू, विषाच्या सौम्य डोसची मात्रा वाढवून त्यांनी त्यांच्या रोगप्रतिकार प्रणालीला प्रशिक्षित केले, ज्यामुळे त्यांच्या शरीरात अशा प्रतिपिंडांची (antibodies) निर्मिती झाली जी विविध प्रकारच्या सर्पदंशाच्या विषावर प्रभावी ठरतात.

ग्लॅनविले यांना त्यांच्या ‘युनिव्हर्सल’ अँटीव्हेनमसाठी (प्रतिविष) अनेक प्रतिपिंडांची गरज होती. त्यापैकी प्रत्येक प्रतिपिंड विषाच्या अनेक वेगवेगळ्या प्रकारांना निष्प्रभ करू शकेल, अशी त्यांची अपेक्षा होती. हे सोपे काम नाही, कारण सर्पदंशाचे विष हे 70 पर्यंत विषारी घटकांचे (toxins) मिश्रण असू शकते आणि वेगवेगळ्या सापांमध्ये या विषाणूंचे संयोजन, प्रकार आणि प्रमाण भिन्न असते. अगदी एकाच प्रजातीमधील सापांमध्ये आणि भौगोलिक प्रदेशानुसारही यात फरक आढळतो. परंतु ग्लॅनविले यांना खात्री होती की त्यांचे उद्दिष्ट गाठणे शक्य आहे, कारण संरचनेनुसार, विषाचे सर्व विषारी घटक सुमारे 10 प्रोटीन वर्गांचे (protein classes) प्रकार आहेत. याचा अर्थ असा की हे प्रोटीन मानवी पेशींना जेथे जोडले जातात, ती मुख्य जागा (key sites) अनेक विषांमध्ये समान असू शकते.

ग्लॅनविले म्हणाले, ‘जर संशोधकांना या समान जोडणीच्या जागांवर हल्ला करणारे प्रतिपिंड सापडले, तर आम्ही एक ‘कॉकटेल’ (अनेक घटकांचे मिश्रण) बनवू शकतो, जे एक युनिव्हर्सल अँटीव्हेनम ठरू शकेल.’ फ्रीडे यांच्या रक्तातील प्रतिपिंड अशाच समान जागांवर काम करतील अशी त्यांना आशा होती. फ्रीडे यांच्याकडून 40 मिलिलीटर रक्ताचा नमुना मिळाल्यावर, ग्लॅनविले यांनी जैव-रसायनशास्त्रज्ञ पीटर क्वाँग आणि नॅशनल इन्स्टिट्यूटस् ऑफ हेल्थ (NIH) तसेच कोलंबिया विद्यापीठातील इतरांसोबत काम करून ‘ब्राॅड-स्पेक्ट्रम’ (व्यापक-श्रेणी) अँटीव्हेनम तयार केले.

2025 मध्ये, ग्लॅनविले, क्वाँग आणि त्यांच्या सहकार्‍यांनी जाहीर केले की, उंदरांवर केलेल्या चाचणीत, फ्रीडे यांच्या रक्तातील प्रतिपिंडांपासून मिळवलेल्या घटकांसह तीन एजंटचे मिश्रण हे ‘इलापिड’ (elapid) कुटुंबातील 19 सापांच्या विषापासून व्यापक संरक्षण प्रदान करते. ‘इलापिड’ कुटुंबात सुमारे 300 प्रजातींचा समावेश आहे, ज्यात विविध कोब्रा, मंबा, तायपान आणि क्रेटस् यांचा समावेश आहे. ग्लॅनविले यांना वाटते की त्यांचे संशोधन दर्शवते की युनिव्हर्सल अँटीव्हेनम आता आवाक्यात आहे. तथापि, इतर तज्ज्ञ या द़ृष्टिकोनाच्या गरज आणि व्यावहारिकतेबद्दल साशंक आहेत. त्यांच्या मते, ‘युनिव्हर्सल अँटीव्हेनम’ची गरज नाही. त्याऐवजी, प्रत्येक भौगोलिक प्रदेशातील सापांनुसार तयार केलेले, स्वस्त आणि लवकर बनवता येतील अशा अनेक अँटीव्हेनमची मालिका विकसित करणे अधिक आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news