

नीमच : देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह असतानाच मध्य प्रदेशातील नीमच जिल्ह्यातील जावद गावातून श्रद्धा आणि अद्भुत हस्तकलेचा एक अनोखा नमुना समोर आला आहे. येथील सूक्ष्म कलाकृती बनवणारे कलाकार राजेश सोनी यांनी चांदीपासून अष्टविनायकाची अत्यंत सूक्ष्म कलाकृती साकारली आहे. या संपूर्ण कलाकृतीची लांबी केवळ ६ मिलीमीटर असून, तिचे वजन अवघे ७० मि.ग्रॅ. आहे. ही कलाकृती आकाराने इतकी लहान आहे की, ती तांदळाच्या दाण्यावर किंवा पूजेत वापरल्या जाणाऱ्या दुर्वांवरही सहज ठेवता येते.
राजेश सोनी यांनी या सूक्ष्म कलाकृतीमध्ये अष्टविनायकाच्या आठही रूपांना साकारले आहे. यात श्री मयूरेश्वर, श्री सिद्धिविनायक, श्री बल्लाळेश्वर, श्री वरदविनायक, श्री चिंतामणी, श्री गिरीजात्मज, श्री विघ्नहर्ता आणि श्री महागणपती यांचा समावेश आहे. या लहान मूर्तींचे सौंदर्य वाढवण्यासाठी शुद्ध हळद-कुंकू आणि अक्षतांचा वापर करण्यात आला आहे. एवढी बारीक कलाकृती तयार करणे अत्यंत कष्ट आणि संयमाचे काम असते. राजेश सोनी यांच्या माहितीनुसार, अष्टविनायकाच्या प्रत्येक रूपाची निर्मिती करण्यासाठी २ ते ३ मिलीमीटरचे छोटे-छोटे भाग तयार करण्यात आले.
यामध्ये गणपतीची सोंड, डोके, पोट, हात, पाय आणि कान वेगळे तयार केले गेले आणि नंतर गॅसच्या मंद आचेवर हे सर्व भाग जोडण्यात आले. यामध्ये तापमानावर नियंत्रण ठेवणे हे सर्वात मोठे आव्हान होते. कारण, किंचितही जास्त उष्णतेमुळे चांदीची बारीक तार वितळू शकत होती. सूक्ष्म कलेच्या क्षेत्रात राजेश सोनी यांनी याआधीही अनेक अनोखे विक्रम केले आहेत. यापूर्वी त्यांनी जगातील सर्वात लहान सोन्याचा अफूचा डोडा, सूक्ष्म ताजमहाल आणि वर्ल्डकप ट्रॉफी बनवली आहे. या अद्भुत कलाकृतींसाठी त्यांची नोंद जागतिक रेकॉर्डमध्येही झाली आहे. आता त्यांनी साकारलेली ही चांदीची अष्टविनायक कलाकृती लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.