‌Artemis 2 mission : ‘आर्टेमिस 2‌’ मोहिमेला हिरवा कंदील; आज होणार प्रक्षेपण

50 वर्षांतील पहिलीच मानवी मोहीम
Artemis 2 mission
Artemis 2 mission
Published on
Updated on

केप कॅनव्हेरल (फ्लोरिडा) : अमेरिकन अंतराळ संस्था ‌‘नासा‌’च्या अत्यंत महत्त्वाकांक्षी ‌‘आर्टेमिस 2‌’ चंद्र मोहिमेने आपला सर्वात मोठा टप्पा पार केला आहे. उड्डाण सज्जतेचा पूर्ण आढावा आणि इतर सर्व तांत्रिक तपासण्यांनंतर, या पहिल्या मानवी चंद्र मोहिमेला बुधवारी (1 एप्रिल) प्रक्षेपणासाठी हिरवा कंदील देण्यात आला आहे.

‌‘काहीतरी खूप मोठे घडणार आहे,‌’ असे प्रतिपादन प्रक्षेपण संचालक चार्ली ब्लॅकवेल-थॉमसन यांनी 30 मार्च रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत केले. 1972 मधील ‌‘अपोलो 17‌’ मोहिमेनंतर पहिल्यांदाच चार अंतराळवीरांना चंद्राच्या कक्षेत पाठवून सुरक्षितपणे परत आणणे, हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. नासाच्या एक्सप्लोरेशन सिस्टम डेव्हलपमेंटच्या प्रभारी सहयोगी प्रशासक लोरी ग्लेझ यांनी मोहिमेबद्दल आत्मविश्वास व्यक्त करताना सांगितले की, ‌‘आम्ही प्रक्षेपणाच्या अगदी जवळ पोहोचलो आहोत आणि आम्ही पूर्णपणे तयार आहोत.‌’ हवामान अंदाजानुसार, बुधवारी प्रक्षेपणासाठी 80 टक्के अनुकूल परिस्थिती असण्याची शक्यता आहे. ‌‘आर्टेमिस 2‌’ ही मोहीम नासासाठी अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे:- जीवनरक्षक प्रणालीची चाचणी : ‌‘ओरियन‌’ क्रू कॅप्सूलमधील अंतराळवीरांसाठी असलेल्या जीवनरक्षक उपकरणांची प्रत्यक्ष अंतराळात ही पहिलीच चाचणी असेल. दहा दिवसांचा प्रवास : सुमारे 10 दिवसांच्या या प्रवासात अंतराळवीर पृथ्वीच्या खालच्या कक्षेच्या पलीकडे जातील. गेल्या 50 वर्षांतील ही पहिलीच मानवी मोहीम असेल. मंगळ मोहिमेची तयारी : या मोहिमेच्या यशावरच भविष्यातील चंद्रावरील मानवी वस्ती आणि मंगळ मोहिमेचे भवितव्य अवलंबून आहे.

56 लाख लोकांची नावे पोहोचणार चंद्रावर

50 वर्षांहून अधिक काळानंतर ‌‘नासा‌’ पुन्हा एकदा आपल्या ‌‘आर्टेमिस 2‌’ मोहिमेद्वारे चंद्राकडे झेप घेणार आहे. 1 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या या ऐतिहासिक प्रवासात केवळ 4 अंतराळवीरच नसतील, तर त्यांच्यासोबत जगातील 56 लाख (5.6 मिलियन) लोकांची नावेही चंद्रावर जाणार आहेत. नासाने एक विशेष ‌‘डिजिटल चिप‌’ तयार केली आहे, ज्यामध्ये जगभरातील त्या सामान्य लोकांची नावे नोंदवण्यात आली आहेत, ज्यांनी या ऐतिहासिक प्रवासाचा भाग होण्यासाठी नोंदणी केली होती. नासाने गेल्या काही महिन्यांत एक जागतिक मोहीम राबवली होती, ज्यामध्ये लोकांना आपले नाव चंद्रावर पाठवण्याची संधी देण्यात आली होती. या सर्व नावांना एका छोट्या मायक्रोचिप मध्ये एन्कोड करण्यात आले आहे. ही चिप ओरियन कॅप्सूलच्या आत एका सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आली आहे. यामध्ये भारतासह जगाच्या कानाकोपऱ्यातून लोकांनी सहभाग नोंदवला आहे, ज्यामुळे ही आतापर्यंतची सर्वात मोठी ‌‘पब्लिक एंगेजमेंट‌’ असलेली अंतराळ मोहीम ठरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news