

वॉशिंग्टन : चंद्राच्या दिशेने ऐतिहासिक प्रवासावर निघालेल्या ‘आर्टेमिस-2’ मोहिमेतील अंतराळवीरांनी अवकाशातून आपला पहिला व्हिडीओ संदेश जारी केला आहे. प्रवासाच्या दुसर्या दिवशी पाठवण्यात आलेल्या या प्रक्षेपणाद्वारे जगभरातील लोकांना खोल अंतराळातील प्रवासाची पहिली झलक पाहायला मिळाली.
‘ओरियन’ अंतराळयानाच्या खिडकीतून दिसणार्या पृथ्वीच्या विलोभनीय द़ृश्याचे वर्णन करताना अंतराळवीर भावुक झाले होते. ‘नासा’चे अंतराळवीर रीड वैझमन म्हणाले, ‘येथून संपूर्ण पृथ्वी उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत स्पष्ट दिसते. हा क्षण इतका अद्भुत होता की, आम्हा चौघांच्याही हालचाली काही काळ थांबल्या होत्या.’ दुसरे अंतराळवीर व्हिक्टर ग्लोव्हर यांनी पृथ्वीला उद्देशून म्हटले, ‘आमच्यावर विश्वास ठेवा, तुम्ही (पृथ्वी) खूपच सुंदर दिसत आहात.’ या मोहिमेत रीड वैझमन, व्हिक्टर ग्लोव्हर, क्रिस्टीना कोच आणि जेरेमी हॅन्सन यांच्यासोबत ‘राईज’ नावाचा एक छोटा पांढरा मून प्लॅश (मऊ बाहुला) देखील आहे.
8 वर्षांच्या लुकास ये या मुलाने हे मॅस्कॉट डिझाईन केले असून, 2,600 स्पर्धकांमधून त्याची निवड करण्यात आली आहे. ‘अपोलो-8’ मोहिमेदरम्यान प्रसिद्ध झालेल्या ‘अर्थराईज’ या छायाचित्रावरून प्रेरणा घेऊन हे नाव देण्यात आले आहे. ओरियन यान वजनरहित अवस्थेत पोहोचताच ग्लोव्हर या बाहुल्यासोबत खेळताना दिसले, जे अंतराळात गुरुत्वाकर्षण नसल्याचे संकेत देण्याचे एक पारंपरिक माध्यम आहे. या गंभीर मोहिमेत काही मजेशीर किस्सेही घडले. मोहिमेदरम्यान ओरियन यानावरील 30 दशलक्ष डॉलर्सचे (सुमारे 250 कोटी रुपये) शौचालय जाम झाले होते. अंतराळवीर क्रिस्टीना कोच यांनी मिशन कंट्रोलच्या मदतीने हा तांत्रिक बिघाड यशस्वीरीत्या दुरुस्त केला. या प्रसंगावर विनोद करताना त्या म्हणाल्या, ‘स्वत:ला ‘स्पेस प्लम्बर’ (अंतराळातील प्लम्बर) म्हणवून घेताना मला अभिमान वाटतोय’. ‘नासा’ने आता हे शौचालय पूर्ववत सुरू झाल्याची पुष्टी केली आहे.