

वॉशिंग्टन : ‘व्हॅलेंटाईन डे’चे औचित्य साधून ‘नासा’ने अंतराळातून टिपलेले एक अतिशय सुंदर छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. अर्जेंटिनातील एका गुलाबी रंगाच्या आणि हृदयाच्या आकारासारख्या दिसणार्या खार्या तलावाने सध्या जगभराचे लक्ष वेधून घेतले आहे.
या तलावाचे नाव ‘सलिनास लास बॅरंकास’ असून, याला ‘लागुना डी सलिनास चिकास’ म्हणूनही ओळखले जाते. हा तलाव अर्जेंटिनाच्या ब्युनोस आयर्स प्रांतातील सखल भागात, बहिया ब्लांका या बंदराच्या शहरापासून साधारण 53 किलोमीटर पश्चिमेला स्थित आहे. नासाच्या ‘अर्थ ऑब्झर्व्हेटरी’नुसार, हा तलाव साधारण 10 किलोमीटर रुंद असून, पावसाळ्यात तो पाण्याने भरतो. मात्र, तीव— सूर्यप्रकाशामुळे येथील पाण्याची वेगाने वाफ होते आणि मागे स्फटिकासारखे मिठाचे थर उरतात.
या तलावाचा गुलाबी रंग सूक्ष्मजीवांमुळे तयार होतो :
लाल शेवाळ (Dunaliella salina): जेव्हा तलावात पाणी जास्त असते (क्षार कमी असतात), तेव्हा गडद लाल रंगाचे शेवाळ वाढते, ज्यामुळे पाण्याचा रंग विटकरी-लाल दिसतो. दुर्मीळ जिवाणूंचा प्रभाव : जेव्हा कडक उन्हामुळे पाणी आटते आणि क्षाराचे प्रमाण वाढते, तेव्हा हे शेवाळ नष्ट होते आणि ‘आर्किया’ (Archaea) सारखे जिवाणू वर्चस्व गाजवतात. यामुळे या तलावाला गडद गुलाबी रंग प्राप्त होतो. स्थानिक लोक वर्षातून दोनदा या तलावातून मीठ काढण्याचे काम करतात. एका वर्षात साधारण 3 लाख मेट्रिक टन मीठ येथून काढले जाते. विशेष म्हणजे, पुढच्या पावसाळ्यात निसर्गतः या मिठाचे साठे पुन्हा भरले जातात. तज्ज्ञांच्या मते, हा मिठाचा खजिना पुढील 5,000 वर्षांपर्यंत असाच टिकून राहू शकतो. निसर्गाची ही किमया अंतराळातून अगदी एखाद्या सुंदर ‘व्हॅलेंटाईन कार्ड’सारखी दिसत आहे.