

नवी दिल्ली : सोशल मीडियावर अनेकदा अंडी, पनीर किंवा मशरूमवरून वादाच्या फैरी झडत असतात. सध्या मशरूमबाबत पुन्हा एकदा तोच जुना प्रश्न विचारला जात आहे: मशरूम म्हणजेच आळिंबी नक्की शाकाहारी आहे की, मांसाहारी? काही लोक ते आवडीने खातात, तर काही जण त्याला मांसाहारी समजून ताटापासून दूर ठेवतात. मशरूम दिसायला भाजीसारखा असतो; पण त्याची चव काहीशी मांसासारखी लागते, त्यामुळे हा संभ्रम निर्माण होणे स्वाभाविक आहे. आता शास्त्रज्ञांनी यावर स्पष्ट उत्तर दिले आहे.
मशरूमबाबतची सर्वात मोठी चूक म्हणजे लोक त्याला ‘भाजी’ किंवा ‘मांस’ या दोनच श्रेणींमध्ये बसवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, विज्ञानानुसार मशरूम हे ना झाड आहे ना प्राणी. हे एका वेगळ्या जैविक वर्गात येते, ज्याला ‘फंगी’ (Fungi) किंवा ‘कवक’ म्हटले जाते. या श्रेणीत यिस्ट आणि मोल्डचाही समावेश होतो. म्हणजेच तांत्रिकद़ृष्ट्या मशरूम ही भाजी नाही; पण याचा अर्थ असाही नाही की, ते मांसाहारी पदार्थ आहे. झाडांना जगण्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज असते. कारण, ते क्लोरोफिलच्या मदतीने प्रकाशसंश्लेषण करतात; पण मशरूममध्ये क्लोरोफिल नसते.
मशरूम अन्नासाठी सूर्यप्रकाशावर अवलंबून नसून ते कुजलेले पालापाचोळा, लाकूड किंवा मृत जैविक पदार्थांपासून पोषण मिळवतात. त्यांची वाढ होण्याची पद्धत झाडांपेक्षा वेगळी आणि काही प्रमाणात प्राण्यांसारखी (दुसर्यावर अवलंबून असणारी) असली, तरी त्यामुळे ते प्राणी ठरत नाहीत. मशरूम जैविकद़ृष्ट्या वेगळ्या श्रेणीत असले, तरी खाण्याच्या बाबतीत ते पूर्णपणे शाकाहारी आणि ‘व्हेगन’ मानले जाते. याची काही प्रमुख कारणे अशी:
पशू उत्पादनांचा अभाव : मशरूमच्या उत्पादनात कोणत्याही प्राण्याचा किंवा प्राण्यांपासून मिळणार्या पदार्थाचा वापर होत नाही.
पोषक तत्त्वांचा खजिना : यामध्ये प्रथिने, विटामीन बी, विटामीन डी आणि सेलेनियम यांसारखे पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात. मांसाहाराला पर्याय : मशरूमची चव आणि पोत मांसासारखा वाटत असल्याने, शाकाहारी लोकांसाठी याला मांसाचा एक उत्तम आणि आरोग्यदायी पर्याय मानले जाते.
निष्कर्ष : स्वयंपाकघरात मशरूमचा वापर भाजीप्रमाणेच केला जातो. त्यामुळे शाकाहारी आणि व्हेगन लोक कोणत्याही संकोचाशिवाय मशरूमचा आपल्या आहारात समावेश करू शकतात.