

हेल्सिंकी : 13 एप्रिल, 2029 रोजी धोकादायक मानला जाणारा 99942 अॅपोफिस (99942 Apophis) नावाचा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे. ही एक अविश्वसनीय घटना असेल, कारण आफ्रिका आणि पश्चिम युरोपमधील दोन अब्जाहून अधिक लोक हे द़ृश्य रात्रीच्या आकाशात दुर्बिणीशिवायही पाहू शकतील. स्वच्छ हवामानात, हा लघुग्रह एका अंधुक तार्यासारखा दिसेल, जो बिग डिपर (सप्तर्षी) तार्यांएवढा तेजस्वी असेल आणि साध्या डोळ्यांनी सहज पाहता येईल.
एमआयटी (MIT) येथील ग्रह विज्ञान विषयाचे प्राध्यापक रिचर्ड बिनझेल यांनी सोमवारी हेलसिंकी, फिनलंड येथे झालेल्या युरोप्लॅनेट विज्ञान काँग्रेसमध्ये सांगितले की, ‘एवढा मोठा लघुग्रह साध्या डोळ्यांनी दिसण्याची ही अंतराळ इतिहासातील पहिलीच वेळ असेल.‘खगोलशास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, इतका मोठा लघुग्रह (340 मीटर रुंद, किंवा आयफेल टॉवरच्या उंचीएवढा) पृथ्वीच्या इतक्या जवळून जाण्याची घटना दर 7,500 वर्षांनी एकदा घडते.
सामान्य लोकांसाठी, हा एक एकदाच दिसणारा अविश्वसनीय आणि नेत्रदीपक सोहळा असेल; पण वैज्ञानिकांसाठी, ही त्याहूनही दुर्मीळ संधी आहे : एक नैसर्गिक प्रयोग, जो हजार वर्षांतून एकदाच घडतो. यामुळे वैज्ञानिकांना पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती एका विशाल लघुग्रहाचा आकार कसा बदलते, हे प्रत्यक्ष पाहता येणार आहे. ‘आपल्याला आता माहीत नाही,’ बिनझेल म्हणाले, ‘आणि जोपर्यंत आपण प्रत्यक्ष पाहणार नाही, तोपर्यंत आपल्याला कळणार नाही.’
अॅस्टेरॉइड धोका संशोधनातील एक अग्रगण्य आणि लघुग्रह व धूमकेतूंच्या धोक्यांचे मूल्यांकन करण्यासाठी वापरल्या जाणार्या टोरिनो इम्पॅक्ट हॅझार्ड स्केलचे जनक असलेल्या बिनझेल यांनी एका गोष्टीवर विशेष जोर दिला. आपल्या सादरीकरणात ते म्हणाले, ‘माझ्या या भाषणातून तुम्हाला काहीही आठवत नसेल, तरी या तीन गोष्टी लक्षात ठेवा : अॅपोफिस पृथ्वीच्या जवळून सुरक्षितपणे जाईल; अॅपोफिस पृथ्वीच्या जवळून सुरक्षितपणे जाईल; अॅपोफिस पृथ्वीच्या जवळून सुरक्षितपणे जाईल.’