

त्रिपोली (लिबिया) : इसवी सन 262 आणि 365 मध्ये झालेल्या भीषण भूकंपांमुळे लिबियाच्या किनारपट्टीवर वसलेले सायरिन हे ऐतिहासिक ग्रीक शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. शतकानुशतके ढिगार्याखाली गाडले गेलेल्या या शहरात 1861 मध्ये ब्रिटिश लष्कराचे इंजिनियर रॉबर्ट मर्डोक स्मिथ आणि नौदलाचे हौशी कलाकार एडविन ऑगस्टस पोर्चर यांनी उत्खनन केले. या मोहिमेत अनेक प्राचीन थडगी आधीच लुटली गेली असली, तरी सँक्चुअरी ऑफ अपोलो मंदिराच्या भागात त्यांना एक ऐतिहासिक ठेवा सापडला.
या उत्खननादरम्यान ग्रीक देवता अपोलोचा एक प्रचंड मोठा आणि देखणा संगमरवरी पुतळा सापडला. सुमारे 8.5 तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्याने हा पुतळा पेडेस्टलवरून खाली कोसळला होता, ज्यामुळे त्याचे डोके धडावेगळे झाले होते. तसेच शरीराचे 3 मुख्य मोठे तुकडे आणि 118 हून अधिक लहान तुकडे झाले होते. सुरुवातीला पुतळ्याच्या पायाजवळ झाडाला गुंडाळलेला साप पाहून संशोधकांचा असा समज झाला की, हा औषधोपचार आणि वैद्यकशास्त्राची देवता एस्क्युलापियसचा पुतळा असावा.
उत्खनन संपल्यानंतर हा पुतळा उंटांच्या साहाय्याने बंदरापर्यंत आणून जहाजाद्वारे लंडनला पाठवण्यात आला. ब्रिटीश म्युझियममध्ये तज्ज्ञांनी या 118 तुकड्यांची अत्यंत कौशल्याने आणि बारकाईने जोडणी केली. त्यानंतर हा पुतळा मूळचा ग्रीक देवता अपोलोचाच असल्याचे सिद्ध झाले. या कलाकृतीत अपोलोला संगीताची देवता (अॅपोलो सिथॅरॉडईड) म्हणून दाखवले असून, त्याच्या डाव्या हातात किथारा (प्राचीन लायरा वाद्य) आहे. तसेच पृथ्वीचा विनाश करू पाहणार्या पायथॉन नावाच्या महाकाय सर्पाचा त्याने वध केल्याचेही यात दर्शवले आहे.