

वॉशिंग्टन : जन्म आणि मृत्यू तसेच त्यादरम्यानचे म्हातारपण व आजारपण कुणाला चुकलेले नाही. मात्र म्हातारपण टाळण्यासाठी अनेक लोक अनेक प्रयत्न करीत असतात. 47 वर्षीय करोडपती ‘टेक गुरु’ ब्रायन जॉन्सन नेहमीच स्वत:वर वृद्धत्वविरोधी प्रयोग करत असतात. आपले वाढते वय रोखण्यासाठी ते कोणत्याही थराला जाण्यास तयार असतात. चिरतरुण राहण्यासाठी त्यांनी सर्वात आधी मुलाचे रक्त स्वत:ला चढवून घेतले होते. यानंतर बेबी फेससाठी चेहर्यात फॅट इंजेक्ट केले होते. दरम्यान या प्रक्रियेनंतरचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल!
ब्रायन जॉन्सनने आपले वय कमी दाखवण्यासाठी आपल्या चेहर्यात फॅट इंजेक्ट केलं. या प्रक्रियेला त्यांनी ‘प्रोजेक्ट बेबी फेस’ नाव दिले होते. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, या प्रयोगाचा परिणाम काय होता यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केला असून भली मोठी पोस्ट लिहिली आहे. या प्रोजेक्टबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, त्यांना चेहर्यात फॅट इंजेक्ट करण्याचा सल्ला देण्यात आला होता. याचे कारण त्यांच्या शरीरातून फार फॅट बाहेर पडत होते. ब्रायन जॉन्सन यांची कायम तरुण राहण्याची इच्छा आहे, म्हणजेच कितीही वय झाले तरी त्याचा प्रभाव चेहर्यावर दिसणार नाही. 2020 मध्ये त्यांची प्रकृती फार खराब झाल्यानंतर त्यांनी हा प्रयत्न सुरू केला होता. त्यावेळी त्यांनी ‘प्रोजेक्ट ब्ल्यूप्रिंट’ सुरू केले होते याअंतर्गत ते कठोर दैनंदिनी पाळतात. यामध्ये ते एकाच प्रकारच्या गोळ्या, भोजन यांचे सेवन करतात. ब्रायन म्हणाले की, प्रकल्पाची ब्ल्यू प्रिंट जसजशी विकसित होत गेली तसतशी छाननी वाढत गेली. आम्हाला असे आढळले आहे की, लोक ज्या प्रकारे तरुण दिसतात त्यासाठी चेहर्यावरील चरबी खूप महत्त्वाची आहे. जर माझ्या चेहर्यावर चरबी नसेल, तर माझे बायोमार्कर्स किती चांगले आहेत हे महत्त्वाचे नसते. म्हणून आम्ही ‘प्रोजेक्ट बेबी फेस’ सुरू केला. आम्ही प्रथम थेरपी निवडली. यात माझ्या शरीरातील नैसर्गिक चरबी वाढवण्यासाठी आवश्यक असलेल्या फॅट-व्युत्पन्न एक्स्ट्रासेल्युलर मॅट्रिक्सचे इंजेक्शन समाविष्ट होते. यासाठी कोणाच्या तरी स्वतःच्या शरीरातील चरबी वापरणे शक्य होते. परंतु समस्या अशी होती की, माझ्या शरीरावर काढण्यासाठी पुरेसे नव्हते, म्हणून मी डोनर वापरला. फॅटच्या इंजेक्शननंतर लगेचच माझा चेहरा सुजायला लागला आणि नंतर तो आणखी वाढला. इतके की, मला बघताही येत नव्हते. ही एक गंभीर अॅलर्जीची प्रतिक्रिया होती. ब्रायन म्हणाले की, सात दिवसांनंतर माझा चेहरा सामान्य झाला आणि आम्ही आमच्या पुढील प्रयत्नांसाठी पुन्हा नियोजन करण्यास सुरुवात केली.