

वॉशिंग्टन : जगात एकीकडे कोट्यवधी लोक तीव्र उष्णतेच्या लाटेचा सामना करत असताना, दुसरीकडे अंटार्क्टिकामधील एका संशोधन केंद्राने तब्बल मायनस ८४.१ अंश सेल्सिअस (मायनस ११९.४ अंश फॅरेनहाईट) या विक्रमी तापमानाची नोंद केली आहे. हे २०१२ नंतरचे पृथ्वीवरील सर्वात कमी तापमान ठरले आहे.
अंटार्क्टिका खंडाच्या अंतर्गत भागात स्थित असलेल्या ‘कॉन्कोर्डिया’ या उच्च-उंचीवरील संशोधन केंद्रावर १८ जुलै रोजी या अत्यंत कमी तापमानाची नोंद झाली. अंटार्क्टिकामध्ये सध्या कडक हिवाळा सुरू असून, तिथे सूर्यप्रकाश अजिबात नसतो. वर्षाच्या या काळात कॉन्कोर्डिया संशोधन केंद्रात तापमान सहसा मायनस ८० अंश सेल्सिअसच्या खाली जाते. त्यामुळे हा प्रकार पूर्णपणे अभूतपूर्व नसला, तरी अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. इटलीच्या ‘नॅशनल अंटार्क्टिक रिसर्च प्रोग्राम’ (PNRA) कडून कॉन्कोर्डिया केंद्राचे नेतृत्व करणारे गॅब्रिएल कारुगाटी यांनी एका मुलाखतीत सांगितले, ‘जिथे नेहमीच भीषण थंडीची अपेक्षा असते अशा ठिकाणीही मायनस ८४ अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान जाणे ही एक उल्लेखनीय घटना आहे.
अंटार्क्टिकामधील हवामान किती बदलू शकते, हेच यावरून दिसून येते.’ फ्रेंच पोलर इन्स्टिट्यूटने दिलेल्या माहितीनुसार, १८ जुलै रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी ६.२५ आणि सकाळी ६.३४ वाजता अशा दोनवेळा तापमान मायनस ८४.१ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले होते. अंटार्क्टिकामधील ही गोठवणारी थंडी जगातील उर्वरित भागांत असलेल्या तीव्र उष्णतेच्या पूर्णपणे विरोधात आहे. उत्तर अमेरिका आणि युरोप सध्या उष्णतेच्या लाटेचा सामना करत आहेत. पश्चिम युरोपमध्ये आतापर्यंतच्या सर्वात उष्ण जून महिन्याची नोंद झाली आहे. त्याचवेळी कॅनडा, अमेरिका, फ्रान्स आणि स्पेन यासारख्या देशांमध्ये जंगलांना भीषण वणवे लागले आहेत.
मानवाद्वारे होणाऱ्या हरितगृह वायूंच्या उत्सर्जनामुळे जागतिकस्तरावर सरासरी तापमान वाढत आहे. परंतु, पृथ्वीची हवामान प्रणाली अत्यंत गुंतागुंतीची आहे. हवामान बदलाचा अर्थ असा नाही की, प्रत्येक ठिकाणी प्रत्येकवेळी उष्णताच वाढेल. यावर कारुगाटी यांनी स्पष्ट केले, ‘हवामान बदल ही दीर्घकालीन जागतिक प्रवृत्ती दर्शवते, तर एखाद्या विशिष्ट ठिकाणच्या हवामान घटनेत अजूनही तीव्र थंडी नोंदवली जाऊ शकते. अंटार्क्टिकावर गुंतागुंतीच्या वातावरणीय प्रक्रियांचा प्रभाव असतो, त्यामुळे एका ठिकाणी अत्यंत कमी तापमान नोंदवले जाणे म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगच्या संकल्पनेला छेद देणे, असे अजिबात होत नाही.’