Beluga Whales Rescue | प्राणीप्रेमींच्या लढ्यामुळे वाचले ३० बेलुगा देवमाशांचे प्राण

Beluga Whales Rescue |
Beluga Whales Rescue | प्राणीप्रेमींच्या लढ्यामुळे वाचले ३० बेलुगा देवमाशांचे प्राण
Published on
Updated on

ओटावा : कॅनडातील 'मरीनलँड' या थिम पार्क मधील ३० 'बेलुगा' प्रजातीच्या पांढऱ्या देवमाशांच्या भविष्याबाबत अखेर कॅनडा सरकार आणि पार्क प्रशासनामध्ये एक महत्त्वपूर्ण करार झाला आहे. या निर्णयामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेला वाद आणि प्राणिमित्रांचा संताप अखेर शांत होण्याची चिन्हे आहेत. या करारानुसार, मरीनलँडमधील सर्व ३० बेलुगा माशांना आता स्पेन आणि अमेरिकेतील विविध सुरक्षित केंद्रांमध्ये हलवण्यात येणार आहे. या ऐतिहासिक पावलामुळे कॅनडातील व्हेल माशांचा व्यावसायिक बंदिवास अधिकृतपणे संपुष्टात येणार आहे.

२०२४ मध्ये मरीनलँड सर्वसामान्यांसाठी बंद झाल्यानंतर या माशांच्या भविष्याचा प्रश्न गंभीर बनला होता. कॅनडाच्या मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने या माशांची चीनला होणारी विक्री रोखल्यानंतर, मरीनलँड प्रशासनाने २०२५ मध्ये या निष्पाप माशांची हत्या करण्याची धमकी दिली होती. या धक्कादायक भूमिकेनंतर जगभरातील प्राणिप्रेमी संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. मात्र, आता या माशांना वाचवण्याचा एक स्पष्ट आराखडा तयार करण्यात आला आहे.

युरोपमधील सर्वात मोठे अ‍ॅक्वेरियम असलेल्या स्पेनच्या 'ओशनोग्राफिक व्हॅलेन्सिया'ने काही माशांना आश्रय देण्याची तयारी दर्शवली आहे. याशिवाय, अमेरिकेतील जॉर्जिया, शिकागो, सॅन डिएगो आणि सॅन अँटोनियो येथील आघाडीच्या अ‍ॅक्वेरियम्सच्या एका समूहाने उर्वरित माशांना स्वीकारण्यास मान्यता दिली आहे. हा बचाव कार्यकम येत्या काही आठवड्यांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. हे प्राणी वर्षानुवर्षे अत्यंत खराब आणि जीर्ण झालेल्या टाक्यांमध्ये पडून होते, तर प्राणिहित यंत्रणांनी यावर कोणतीही ठोस कारवाई केली नाही," अशी खंत 'ॲनिमल जस्टिस'च्या वकील केटलिन मिचेल यांनी व्यक्त केली.

या स्थलांतराबाबत प्राणिमित्रांमध्ये काही अंशी चिंताही आहे. भूतकाळात मरीनलँडमधून कनेक्टिकट येथील अ‍ॅक्वेरियममध्ये पाठवण्यात आलेल्या पाच बेलुगांपैकी तीन माशांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या प्रवासापूर्वी स्वतंत्र वैद्यकीय तज्ज्ञांकडून या माशांची सखोल आरोग्य तपासणी केली जावी, अशी मागणी होत आहे. कॅनडा सरकारनेही स्पष्ट केले आहे की, केवळ माशांच्या आरोग्याची खात्री पटल्यानंतरच अंतिम निर्यात परवाने दिले जातील. हा निर्णय नोव्हा स्कॉशियामधील स्थानिक अभयारण्यासाठी एक मोठा धक्का मानला जात असला, तरी या ३० बेलुगा माशांना अखेर मृत्यूच्या छायेतून बाहेर पडून नवीन आणि सुरक्षित आयुष्य मिळणार आहे, हीच सर्वात मोठी दिलासादायक बाब आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news