

शरीर निरोगी आणि फिट ठेवण्यासाठी आपण आपला आहार आणि जीवनशैलीत अनेक बदल करतो. मात्र, इतकेच पुरेसे आहे का? तर त्याचे उत्तर ‘नाही’ असे आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण आहार आणि झोपेसोबतच मानसिक शांततेकडे दुर्लक्ष करत आहोत. विशेषतः तुमचा ‘स्वभाव’ तुमच्या आरोग्यावर मोठा परिणाम करतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जास्त राग येणे ही केवळ एक सवय नसून, ती तुम्हाला गंभीर आजारी पाडणारी स्थिती आहे.
जास्त राग येण्यामागे अनेक मानसिक, जैविक आणि सामाजिक कारणे असू शकतात :
मेंदूची प्रक्रिया : जेव्हा व्यक्ती चिंता किंवा तणावात असते, तेव्हा मेंदूतील भावनांवर नियंत्रण ठेवणारा ‘अमिगडाला’ (Amygdala) हा भाग अधिक सक्रिय होतो, ज्यामुळे राग पटकन येतो.
हार्मोनल असंतुलन : झोपेच्या कमतरतेमुळे शरीरात कोर्टिसोल आणि अॅड्रेनालिन यांसारखे स्ट्रेस हार्मोन्स वाढतात, ज्यामुळे शरीर नेहमी ‘फाईट मोड’मध्ये राहते.
इतर कारणे : कामाचा ताण, आर्थिक दबाव, कौटुंबिक वाद किंवा जुना मानसिक धक्का ( Trauma) ही देखील राग येण्याची प्रमुख कारणे आहेत.
जेव्हा आपल्याला राग येतो, तेव्हा शरीरात अनेक जैविक बदल घडतात:
1. हृदयाची गती वाढणे : रागाच्या भरात हृदय वेगाने पंप करू लागते आणि रक्तवाहिन्या आकुंचन पावतात.
2. स्नायूंमध्ये ताण : जास्त रागामुळे शरीरातील स्नायू कडक होतात आणि सतत तणाव जाणवतो.
3. मानसिक अस्थिरता : वारंवार राग आल्यामुळे मेंदूमध्ये नकारात्मक विचारांचा पॅटर्न तयार होतो, ज्यामुळे चिडचिडेपणा वाढतो.
हाय ब्लड प्रेशर : सततच्या रागामुळे रक्तदाब अचानक वाढतो. ही स्थिती कायम राहिल्यास तुम्ही उच्च रक्तदाबाचे रुग्ण होऊ शकता, ज्याचा परिणाम किडनी आणि मेंदूवर होतो.
हार्ट अटॅक आणि स्ट्रोक : अनेक संशोधनांनुसार, वारंवार रागवणार्या लोकांमध्ये हार्ट अटॅकचा धोका 2 ते 3 पटीने वाढतो. रागामुळे धमन्यांमध्ये ब्लॉकेज निर्माण होण्याची शक्यताही बळावते.
किडनी फेल्युअर : उच्च रक्तदाबामुळे किडनीच्या कार्यावर गंभीर परिणाम होऊन किडनी निकामी होण्याचा धोका असतो.
तज्ज्ञांचा सल्ला
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही हसतमुख राहिलात आणि रागावर नियंत्रण मिळवले, तर आरोग्यात मोठी सुधारणा होऊ शकते. योगासने, पुरेशी झोप आणि ध्यान यांच्या मदतीने तुम्ही या ‘सायलेंट किलर’वर मात करू शकता.