

लंडन : नैऋत्य इंग्लंडमधील प्रसिद्ध ऐतिहासिक वारसा स्थळ असलेल्या 'स्टोनहेंज'जवळ दोन प्राचीन लाकडी खांबांचे अवशेष सापडले आहेत. हे खांब उन्हाळा आणि हिवाळ्यातील अयन दिनांच्या स्थितीशी तंतोतंत जुळणारे आहेत. काळानुरूप हे लाकडी खांब आता कुजले असून, केवळ त्यांच्यासाठी खोदलेल्या खड्ड्यांचे अवशेष शिल्लक आहेत.
पुरातत्त्वशास्त्रज्ञांच्या मते, ही रचना स्टोनहेंजपेक्षाही जुनी असून, एखादे कायमस्वरूपी स्मारक उभारण्यापूर्वीचे हे एक तात्पुरते धार्मिक स्थळ असावे. हा स्टोनहेंजचाच एक प्रारंभिक नमुना असावा, असाही अंदाज वर्तवला जात आहे. या प्रकल्पाचे नेतृत्व करणारे 'वेसेक्स आर्किऑलॉजी'चे पुरातत्त्वशास्त्रज्ञ फिल हार्डिंग यांनी बुधवारी (१७ जून) एका पत्रकार परिषदेत सांगितले की, विश्लेषणानुसार प्राचीन लोक उन्हाळा आणि हिवाळ्यातील अयन दिन निश्चित करण्यासाठी या खांबांचा वापर करत असत. ‘मध्य उन्हाळ्यात सूर्य कुठे उगवतो आणि मध्य हिवाळ्यात तो कुठे मावळतो, हे क्षितिजावरील बिंदू शोधण्याची क्षमता त्या काळातील लोकांमध्ये होती. हे त्यांचे एक अग्रगण्य आणि अभूतपूर्व यश होते,’ असे हार्डिंग म्हणाले. (दरम्यान, २१ जून रोजी स्टोनहेंज येथे २०२६ चा 'समर सॉल्सटिस' म्हणजेच उन्हाळ्यातील अयन दिन साजरा केला जाणार आहे.) 'वेसेक्स आर्किऑलॉजी' या खासगी संस्थेने १८ जून रोजी ब्रिटनमध्ये या शोधाची अधिकृत घोषणा केली. या संशोधनाचा अहवाल लवकरच पुनरावलोकनानंतर प्रसिद्ध केला जाईल. हे प्राचीन स्मारक स्टोनहेंजपासून काही मैल पूर्वेला असलेल्या 'बुलफोर्ड' गावाजवळील जमिनीवर सापडले आहे. येथे सुमारे ४०० फूट (१२० मीटर) अंतरावर दोन मोठे लाकडी खांब होते. ही जमीन सध्या ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाच्या ताब्यात आहे. परंतु, पुरातत्त्वशास्त्रज्ञांना २०१५ पासून येथे उत्खनन करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
स्टोनहेंजशी साधर्म्य
संशोधकांना यापूर्वी येथे 'हेंजेस'चे (मातीचे गोल बांध आणि चर) दोन अवशेष आणि सुमारे ५,००० वर्षांपूर्वीच्या म्हणजेच स्टोनहेंज पूर्ण होण्याच्या काही शतके आधीच्या, नवाश्मयुगीन काळातील डझनभर खड्डे सापडले होते. या खड्ड्यांमध्ये प्राण्यांची हाडे, मातीची भांडी, गारगोटीचे दगड आणि कोळसा सापडला होता. स्टोनहेंजच्या उभारणीचा पहिला टप्पा सुरू असतानाच्या काळातील हे अवशेष असावेत, असा संशोधकांचा अंदाज आहे.