Ancient Swan Fossil | न्यूझीलंडमध्ये सापडले हंसाचे प्राचीन जीवाश्म

Ancient Swan Fossil |
Ancient Swan Fossil | न्यूझीलंडमध्ये सापडले हंसाचे प्राचीन जीवाश्म
Published on
Updated on

ऑकलंड : न्यूझीलंडच्या सेंट्रल ओटागो येथील ‘सेंट बाथन्स'च्या चिखलात शास्त्रज्ञांना हंसाचे एक अत्यंत प्राचीन जीवाश्म सापडले आहे. सुमारे १६ ते १९ दशलक्ष (१.६ ते १.९ कोटी) वर्षांपूर्वीच्या या जीवाश्मांच्या पुनर्तपासणीमुळे न्यूझीलंडमधील महाकाय पक्ष्यांच्या उत्क्रांतीबाबतचा अनेक दशकांचा जुना सिद्धांत बदलला आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ ओटागोचे सहयोगी प्राध्यापक निक रॉलेन्स आणि त्यांच्या टीमने यापूर्वी सामान्य हंस समजल्या जाणाऱ्या ११ हाडांच्या अवशेषांची पुन्हा तपासणी केली. यात त्यांना लहान हंसाच्या आकाराची एक पूर्णपणे अज्ञात प्रजाती सापडली. शास्त्रज्ञांनी या प्रजातीला ‘मीटरचेन लुटी’ असे नाव दिले आहे. प्राचीन ग्रीक भाषेत 'मीटरचेन' म्हणजे 'मदर गूस' (हंस माता) आणि लॅटिन भाषेत ‘लुटी' म्हणजे ‘चिखलातील', असा या नावाचा रंजक अर्थ होतो. हा अभ्यास ‘हिस्टोरिकल बायोलॉजी' या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे.

जुना सिद्धांत कसा मोडीत निघाला?

यापूर्वी शास्त्रज्ञांचा असा विश्वास होता की, सेंट बाथन्समध्ये सापडलेला हा प्राचीन हंस न्यूझीलंडमधील प्रसिद्ध महाकाय आणि न उडू शकणाऱ्या ‘नेमियोर्निस' हंसाचा थेट पूर्वज होता. याचा अर्थ हा वंश न्यूझीलंडमध्ये किमान १४ दशलक्ष वर्षांपासून अस्तित्वात होता. नवीन जनुकीय आणि जीवाश्म पुराव्यांनी हा दावा फेटाळला आहे. नवीन संशोधनानुसार, 'नेमियोर्निस' हंसाचे पूर्वज साधारण ७ दशलक्ष वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियातून न्यूझीलंडमध्ये आले होते. तर 'मीटरचेन लुटी' हा वंश १४ दशलक्ष वर्षांपूर्वीच येथे आला आणि कोणतीही संतती न सोडता नामशेष झाला. या शोधामुळे हे स्पष्ट होते की, न्यूझीलंडमधील पक्ष्यांचा इतिहास स्थिर नसून जीवसृष्टीचा उदय, विनाश आणि उत्क्रांतीच्या वेगाने बदलणाऱ्या प्रवासाने भरलेला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news