

लंडन : आजच्या काळात वैद्यकीय विज्ञानाने इतकी प्रगती केली आहे की, मोठी शस्त्रक्रियादेखील रुग्णाला कळत नाही. मात्र, ‘एनेस्थेसिया’चा (भूल देण्याचे शास्त्र) शोध लागण्यापूर्वी शस्त्रक्रिया हा रुग्णासाठी एखाद्या भयानक स्वप्नासारखा प्रकार होता. एनेस्थेसियाचा शोध लागण्यापूर्वी शस्त्रक्रिया रुग्ण शुद्धीत असताना केली जात असे आणि त्याला होणार्या वेदना असह्य असायच्या. वेदना कमी करण्यासाठी रुग्णाला चक्क दारू, अफू, भांग किंवा काही जडीबुटी दिल्या जायच्या. वेदनेमुळे रुग्ण हलू नये म्हणून अनेकदा त्याला दोरखंडाने घट्ट बांधून ठेवले जायचे.
त्याकाळी डॉक्टर किती निष्णात आहे, हे तो किती वेगाने शस्त्रक्रिया करतो यावरून ठरवले जायचे. शस्त्रक्रिया जितकी लवकर संपेल, तितका रक्तस्राव कमी होईल आणि रुग्णाचे वाचण्याचे प्रमाण वाढेल, असे मानले जायचे. आजच्या आधुनिक ऑपरेशन थिएटरसारखी स्वच्छता पूर्वी नसायची. डॉक्टर रक्ताने माखलेले जुने कोट घालूनच शस्त्रक्रिया करत असत. संसर्गाबद्दल जास्त माहिती नसल्यामुळे शस्त्रक्रिया यशस्वी होऊनही अनेक रुग्णांचा नंतर संसर्गामुळे मृत्यू होत असे. वैद्यकीय जगतात 16 ऑक्टोबर हा दिवस ‘इथर डे’ म्हणून ओळखला जातो. याच दिवशी आधुनिक एनेस्थेसियाचा पाया रचला गेला.
अमेरिकेतील मॅसॅच्युसेटस् जनरल हॉस्पिटलमध्ये दंतवैद्यक विलियम टी. जी. मॉर्टन यांनी पहिल्यांदा ‘इथर’चा यशस्वी वापर करून विनावेदना शस्त्रक्रिया केली. या घटनेनंतर क्लोरोफॉर्मसारखी इतर भूल देणारी औषधे विकसित झाली आणि शस्त्रक्रियेचे स्वरूप पूर्णपणे बदलले. आज एनेस्थेसियामुळे डॉक्टरांना शांतपणे आणि अचूक शस्त्रक्रिया करणे शक्य झाले आहे. रुग्णाला वेदना होत नसल्यामुळे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियाही आता सोप्या झाल्या आहेत. 16 ऑक्टोबर 1846 च्या त्या एका घटनेने वैद्यकीय क्षेत्रात खर्या अर्थाने क्रांती घडवून आणली.