Ancient Roman Roads | ...म्हणून प्राचीन रोमन रस्ते असायचे एकदम सरळ

संशोधनातून उलगडले २,००० वर्षे जुने गुपित
Ancient Roman Roads |
Ancient Roman Roads | ...म्हणून प्राचीन रोमन रस्ते असायचे एकदम सरळ
Published on
Updated on

रोम : प्राचीन रोमन साम्राज्यातील वाहतूक अभियंत्यांनी युरोप, उत्तर आफ्रिका आणि मध्य पूर्वेच्या काही भागांमध्ये रस्त्यांचे एक प्रचंड मोठे जाळे निर्माण केले होते. रोमन साम्राज्यातील प्रवास आणि व्यापारासाठी ही रस्ते प्रणाली अत्यंत महत्त्वाची मानली जात असे. या शतकानुशतके जुन्या रस्त्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे रस्ते कमालीचे सरळ असायचे. त्याचे रहस्य आता दोन हजार वर्षांनंतर उलगडण्यात यश आले आहे.

या सरळ रस्त्यांची काही उत्तम उदाहरणे म्हणजे इटलीतील ‘व्हाया अप्पिया’ हा रस्ता, जो रोम शहराला दक्षिण इटलीतील ब्रुंडिसियम बंदराशी जोडायचा. ५०० किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या या रस्त्याचे बहुतांश भाग अगदी सरळ रेषेत आहेत. तसेच, दक्षिण इंग्लंडमधील ‘स्टेन स्ट्रीट’ हा ९२ किलोमीटरचा रस्ता लंडनला चिचेस्टरशी जोडण्यासाठी बांधला गेला होता, तोही बहुतांश सरळ आहे. मध्य पूर्वेमध्येही तुर्कियेतील अँटिओकपासून ते आताच्या गाझा पट्टीपर्यंतचा किनारपट्टीचा रोमन रस्ता असाच सरळ बांधण्यात आला होता. नुकत्याच झालेल्या एका मॅपिंग प्रोजेक्टमध्ये रोमन साम्राज्यातील तब्बल ३,००,००० किलोमीटर रस्त्यांचा नकाशा तयार करण्यात आला असून, अनेक रस्ते अजूनही जमिनीखाली दडलेले असण्याची शक्यता आहे; पण प्रश्न असा पडतो की, त्या काळात आधुनिक तंत्रज्ञान नसतानाही रोमन अभियंत्यांनी रस्त्यांमधील अनावश्यक वळणे टाळून ते अगदी सरळ कसे बांधले? याचे उत्तर रोमन अभियंत्यांकडे असलेल्या तीन प्रमुख सर्वेक्षण उपकरणांमध्ये दडलेले आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ सिन्सिनॅटीचे असोसिएट प्रोफेसर मॅरियन क्रुस यांनी स्पष्ट केले की, अनेकदा रोमन लोकांनी आधीपासून अस्तित्वात असलेल्या जुन्या रस्त्यांवरच नवीन रस्ते बांधले. त्यांनी वेगवेगळ्या संस्कृतींनी तयार केलेले जुने रस्ते आपल्या रस्ते जाळ्यात समाविष्ट केले होते. रोमानियातील ‘व्हॅसिले पार्वन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किओलॉजी’च्या संशोधक एड्रियाना पॅनाईट यांनी सांगितले की, जेव्हा रोमन अभियंते अगदी नवीन रस्ते तयार करायचे, तेव्हा ते रस्ते सरळ रेषेत ठेवण्यासाठी प्रामुख्याने तीन उपकरणांचा सातत्याने वापर करत असत : १. द डायोप्ट्रा : कोनांचे मोजमाप करण्यासाठी आणि अंतर अचूक ठेवण्यासाठी याचा वापर केला जाई.

२. द ग्रोमा : काटकोन आणि सरळ रेषा आखण्यासाठी हे सर्वात महत्त्वाचे साधन होते. ३. द कोरोबेटस्‌ : रस्त्याची पातळी सपाट ठेवण्यासाठी आणि उतार मोजण्यासाठी या जल-पातळी यंत्राचा वापर केला जात असे. या प्राचीन आणि अचूक उपकरणांच्या जोरावरच रोमन अभियंत्यांनी हजारो वर्षांपूर्वी अभियांत्रिकीचा असा चमत्कार घडवला, ज्याचे अवशेष आजही जगभरात पाहायला मिळतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news