Ancient Shark Graveyard | इजिप्तच्या वाळवंटात आढळली प्राचीन शार्क माशांची ‘स्मशानभूमी’

Ancient Shark Graveyard |
Ancient Shark Graveyard | इजिप्तच्या वाळवंटात आढळली प्राचीन शार्क माशांची ‘स्मशानभूमी’
Published on
Updated on

कैरो : संशोधकांनी इजिप्तच्या वाळवंटाच्या मध्यभागी प्राचीन शार्क माशांची एक भव्य ‘स्मशानभूमी’ शोधून काढली आहे. इजिप्तच्या पश्चिमेकडील वाळवंटात असलेल्या ‘अबू-तर्तूर’ पठार परिसरात २०२० ते २०२२ दरम्यान केलेल्या उत्खननात शार्कच्या सात विविध प्रजातींचे लाखो वर्षांपूर्वीचे अश्मीभूत दात सापडले आहेत. या शोधामुळे कधीकाळी या कोरड्या वाळवंटी भागात असणाऱ्या अथांग समुद्राच्या अस्तित्वावर नवीन प्रकाश पडला आहे. संशोधकांनी १८ ऑगस्ट रोजी ‘क्रेटेशियस रिसर्च’ या नियतकालिकात आपला हा शोधनिबंध प्रसिद्ध केला आहे.

‘हा अभ्‍यास सिद्ध करतो की, आज जिथे पठार आहे, तो भाग एकेकाळी समृद्ध सागरी जीवनाने नटलेला एक विशाल समुद्र होता. तेथील तापमान, सूर्यप्रकाश आणि आक्‍सिजनची पातळी सागरी जीवांच्‍या वाढीसाठी व विकासासाठी अत्‍यंत अनुकूल होती,’ असे या अभ्यासाचे प्रमुख लेखक आणि कैरो विद्यापीठातील पुरातत्त्‍वशास्त्रज्ञ तांरिक यासीन यांनी सांगितले. लंडनच्या नॅचरल हिस्ट्री म्युझियमनुसार, ‘क्रेटेशियस काळात’ (सुमारे १४.५ कोटी ते ६.६ कोटी वर्षांपूर्वी) पृथ्वीचे तापमान आजच्या तुलनेत अधिक उष्ण होते आणि समुद्राची पातळी आजच्यापेक्षा सुमारे ५५८ फूट (१७० मीटर) जास्त होती.

त्यामुळे आज कोरड्या पडलेल्या अनेक भूप्रदेशांवर, जसे की इजिप्तचे हे वाळवंट, त्या काळात उथळ समुद्र पसरलेले होते. अबू-तर्तूर पठार हे उत्तर-क्रेटेशियस काळातील ‘दुवी फॉर्मेशन’ या खडकांच्या रचनेचा एक भाग आहे, जे इजिप्तच्या पूर्व आणि पश्चिम वाळवंटात पसरलेले आहे. यापूर्वी झालेल्या संशोधनात येथे मासे, सागरी कासवे आणि इतर जलचर सरपटणाऱ्या प्राण्यांचे जीवाश्म सापडले होते, ज्यावरून येथे पूर्वी एक समृद्ध सागरी परिसंस्था अस्तित्वात असल्याचे स्पष्ट झाले होते. या परिसरातील खडक फॉस्फोराईटने समृद्ध आहेत, जो एकप्रकारचा गाळाचा खडक असून तो सागरी प्राण्यांच्या कवचांपासून आणि हाडांपासून तयार होतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news