Sea T rex | डायनासोरच्या काळात समुद्रातही होता अनोखा ‘टी-रेक्स’!

Sea T rex |
Sea T rex | डायनासोरच्या काळात समुद्रातही होता अनोखा ‘टी-रेक्स’!
Published on
Updated on

न्यूयॉर्क : जगाला आतापर्यंत जमिनीवर शिकार करणारा महाकाय ‘टी. रेक्स’ माहित होता; परंतु आता शास्त्रज्ञांनी एका अशा नवीन ‘टी. रेक्स’चा शोध लावला आहे, जो जमिनीवर नाही तर प्राचीन समुद्रावर राज्य करायचा. डायनासोरच्या काळात समुद्रात राहणार्‍या ‘मोसासॉर’ या सागरी सरपटणार्‍या प्राण्यांच्या (Marine Reptile) समूहातील एका नवीन प्रजातीचा शास्त्रज्ञांनी शोध लावला आहे.

हा जीव ‘क्रिटेशियस कालखंडात’ (सुमारे 14 कोटी 50 लाख ते 6 कोटी 60 लाख वर्षांपूर्वी) अस्तित्वात होता. या नवीन प्रजातीचा समावेश ‘टायलोसॉरस’ (Tylosaurus) या आधीच माहित असलेल्या वंशामध्ये (Genus) करण्यात आला आहे. मात्र, त्याचे नवीन प्रजाती नाव ‘टायलोसॉरस रेक्स’ (Tylosaurus rex) - म्हणजेच थोडक्यात ‘टी. रेक्स’ ( T. rex) असे ठेवण्यात आले असून, यामुळे तो या समूहातील इतर मोसासॉर प्रजातींपेक्षा वेगळा ठरला आहे. ‘बुलेटीन ऑफ द अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री’ या नियतकालिकात गुरुवारी (21 मे) प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, ‘टायलोसॉरस रेक्स’ या नावाचा अर्थ ‘टायलोसॉरसचा राजा’ असा होतो. या जीवाचे अवशेष सुमारे 8 कोटी वर्षे जुने असून, अनेक दशकांपूर्वी प्रामुख्याने उत्तर टेक्ससमध्ये ते सापडले होते.

हा सागरी ‘टी. रेक्स’ तब्बल 43 फूट (13 मीटर) लांब होता, म्हणजेच त्याची लांबी एखाद्या मोठ्या ‘टूर बस’एवढी होती. त्याचे दात करवतीसारखे तीक्ष्ण आणि जबडा कमालीचा शक्तिशाली होता. विशेष म्हणजे, या जीवाच्या अश्मीभूत अवशेषांवर झालेल्या जखमांवरून, हे जीव आपल्याच प्रजातीच्या इतर प्राण्यांशी अत्यंत हिंसक लढाया करायचे, याचे पुरावे मिळाले आहेत. ‘टेक्ससमध्ये प्रत्येक गोष्ट मोठी असते, आणि असे दिसते की त्यात आता मोसासॉरचाही समावेश झाला आहे,’ असे या अभ्यासाच्या प्रमुख लेखिका आणि न्यूयॉर्कमधील अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री येथील जीवाश्मशास्त्र संशोधक अमेलिया झिटलो यांनी एका निवेदनात म्हटले आहे. म्युझियमच्या संग्रहातील एका जीवाश्माचे निरीक्षण करत असताना झिटलो यांच्या लक्षात आले की, ‘टायलोसॉरस प्रोरीगर’ (1869 मध्ये पहिल्यांदा शोधलेली मोसासॉरची प्रसिद्ध प्रजाती) असे लेबल लावलेला एक अवशेष या प्रजातीच्या इतर अवशेषांशी जुळत नव्हता.

हा अनोखा जीवाश्म 1979 मध्ये डॅलसबाहेरील एका कृत्रिम जलाशयाजवळ सापडला होता. यानंतर झिटलो आणि त्यांच्या सहकार्‍यांनी हार्वर्डच्या ‘म्युझियम ऑफ कम्पॅरेटिव्ह झूलॉजी’मध्ये असलेल्या मूळ ‘टायलोसॉरस प्रोरीगर’च्या जीवाश्माशी याची तुलना केली. तेव्हा हा अवशेष एका संपूर्णपणे नव्या प्रजातीचा असल्याचे स्पष्ट झाले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, केवळ हा एकच अवशेष चुकीचा ओळखला गेला नव्हता, तर इतर संस्थांमध्ये ठेवलेल्या डझनभर (12 हून अधिक) जीवाश्मांमध्येही हीच वैशिष्ट्ये आढळून आली, जे आतापर्यंत चुकीच्या नावाने ओळखले जात होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news