

मेक्सिको सिटी : मेक्सिकोच्या युकाटन द्वीपकल्पातील कोबा नावाच्या प्राचीन माया संस्कृतीमधील शहरात संशोधकांना शतकानुशतके जुन्या शिलालेखांचे अर्थबोधन करून एका अज्ञात राणीच्या नावाचा व इतर माहितीचा शोध लागला आहे. मेक्सिकोच्या राष्ट्रीय मानववंशशास्त्र आणि इतिहास संस्थेच्या निवेदनानुसार, या राणीचे नाव ‘इक्स चाक चिन’ असे आहे. तिने सहाव्या शतकात ‘चंचल पाण्याची नगरी’ म्हणून ओळखल्या जाणार्या कोबावर राज्य केले.
कोबा हे माया जगातील एक मोठे शहरी केंद्र होते आणि सुमारे 350 ई.स.पूर्व ते 14 व्या शतकापर्यंत येथे वस्ती होती. या शहरात चार तलावांच्या भोवती बांधलेली उच्चभू्र घरे, हजारो निवासी इमारती, अनेक पांढर्या दगडाचे रस्ते आणि अनेक पिरॅमिडस् यांचा समावेश होता. 2024 मध्ये, INAH च्या पुरातत्त्वशास्त्रज्ञांना कोबा येथील एका दगडी पायर्यांवर कोरलेला एक मोठा शिलालेखाचा मजकूर आढळला, ज्याला त्यांनी ‘फाऊंडेशन रॉक’ असे नाव दिले.
‘द युकाटन टाइम्स’नुसार, झीज झाल्यामुळे ‘फाऊंडेशन रॉक’वरील 123 हायेरोग्लिफ पॅनेल्सचे भाषांतर करणे कठीण झाले होते. परंतु, त्यानंतर सापडलेल्या अतिरिक्त 23 स्टेल म्हणजे कोरलेले उभे दगडी खांब यांसारख्या इतर पुराव्यांमुळे तज्ज्ञांना मजकूर समजून घेण्यास मदत झाली. युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास ऑस्टिनचे डेव्हिड स्टुअर्ट आणि नॅशनल ऑटोनॉमस युनिव्हर्सिटी ऑफ मेक्सिकोचे ओक्टाव्हियो एस्पार्झा ओल्गुइन यांसारख्या प्राचीन मायान मजकूर तज्ज्ञांनी अलीकडेच ‘कोबा फाऊंडेशन रॉक’वरील एक पॅनेल आणि स्थळावरील दोन स्टेल यांच्यातील माहिती जुळवली. तेव्हा त्यांना कळून चुकले की ते एकाच व्यक्तीचा, म्हणजेच इक्स चाक चिनचा उल्लेख करत आहेत.
फाऊंडेशन रॉकवर राणी इक्स चाक चिनच्या राज्याभिषेकाचा उल्लेख असला, तरी तिच्या राजवटीच्या नेमक्या तारखा स्पष्ट नाहीत. तथापि, या माया राणीच्या नावाचा उल्लेख बॉल कोर्टासारख्या बांधकाम प्रकल्पांशी संबंधित आहे, जे माया कॅलेंडरनुसार 9.7.0.0.0 म्हणजेच 8 डिसेंबर, 573 च्या आसपास झाले असावे. संशोधकांना असे वाटते की, इक्स चाक चिन ही एक अत्यंत शक्तिशाली राणी असावी, कारण त्यांनी तिचा संबंध राजकीय आणि लष्करीद़ृष्ट्या प्रभावी असलेल्या कान राज्याचा शासक टेस्टिगो सिएलो याच्याशी जोडला आहे. कान राज्य ‘सर्प राजांसाठी’ प्रसिद्ध होते. माया संस्कृतीत महिला शासक दुर्मीळ होत्या. शेकडो राजांच्या तुलनेत फक्त काही डझन राण्या ज्ञात आहेत. परंतु, उत्तर क्लासिक काळात (550 ते 830) ‘रेड क्वीन’सारख्या प्रभावी महिला सत्तेत आल्या. ‘रेड क्वीन’ने सातव्या शतकाच्या मध्यभागी पालेन्के या माया शहरावर राज्य केले होते.