

लंडन ः ग्रीसच्या पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी 2000 वर्षांपूर्वीचे एक भव्य प्राचीन थडगे शोधून काढले आहे, जे शतकानुशतके दफनभूमी म्हणून वापरण्यात आले होते आणि नंतर उपचार स्थळ म्हणून रूपांतरित झाले. यासंदर्भातील पुराव्यांमध्ये ‘हीलिंग सर्पेंट’ असलेली अपोलोची सोन्याची अंगठी आणि मानवी शरीराच्या विविध भागांच्या लहान मूर्ती आढळल्या आहेत.
हे थडगे 2024 च्या शरद ऋतूत चिलिओमोडी या ग्रीसच्या पेलोपोनीज प्रदेशातील गावात सापडले. ग्रीसच्या सांस्कृतिक मंत्रालयाने याची माहिती दिली.‘टी’ आकाराचे हे स्मारक 9 बाय 24.3 फूट (2.7 बाय 7.4 मीटर) इतके मोठे आहे. याचे मुख्य प्रवेशद्वार दगडी आवरणाने बंद केले होते. या थडग्याची शैली पाहता, ते हेल्लेनिस्टिक काळात (इ.स.पू. 323 ते 30) बांधले गेले असावे, असे तज्ज्ञांचे मत आहे. मुख्य कक्षात एक मोठी दगडी शवपेटी आणि भिंतीलगत पाच लहान दगडी खोबणी आढळल्या. शवपेटीत एका स्त्रीचे सांगाडे सापडले; मात्र इतर थडगे लुटले गेले होते. ही दफनभूमी अनेक शतकांपर्यंत वापरण्यात आली, त्यानंतर रोमन काळाच्या अखेरच्या टप्प्यात (इ.स. 250 ते 450) हे ठिकाण उपचार स्थळ म्हणून ओळखले जाऊ लागले. उत्खननात हेल्लेनिस्टिक आणि रोमन काळातील विविध वस्तू सापडल्या, ज्यामध्ये उपयुक्त रत्नांनी कोरलेली अपोलोची सोन्याची अंगठी आढळली. अपोलो हा आरोग्य आणि वैद्यकशास्त्राचा देव मानला जातो. या अंगठीवर सापाचे चित्र कोरलेले आहे, जो वैद्यकीय क्षेत्राचे प्रतीकात्मक चिन्ह मानला जाते. याशिवाय, येथे नाणी, सोन्याची पाने, लहान मडकी, लोह व कांस्याच्या वस्तू, अत्तरे ठेवण्यासाठीच्या कुप्या आणि काच मण्यांचे दागिने सापडले. थडग्याच्या बाहेरही काही पुरावशेष मिळाले, जे याला उपचार स्थळ म्हणून वापरण्यात आल्याचे सूचित करतात. येथे मातीने बनवलेली मानवी बोटे आणि हाताचा भाग मिळाला. असे शारीरिक अवशेष भक्तांनी त्यांच्या आजारांवरील उपचारांसाठी किंवा रोगमुक्त झाल्याबद्दल देवांचे आभार मानण्यासाठी अर्पण केले असावेत.