Ancient Egypt City | पिरॅमिडपेक्षाही जुने आहे इजिप्तचे ‘हे’ प्राचीन शहर

Ancient Egypt City | पिरॅमिडपेक्षाही जुने आहे इजिप्तचे ‘हे’ प्राचीन शहर
Ancient Egypt City | पिरॅमिडपेक्षाही जुने आहे इजिप्तचे ‘हे’ प्राचीन शहर
Published on
Updated on

कैरो : इजिप्तची संस्कृती ही जगातील सर्वात गूढ आणि प्राचीन संस्कृतींपैकी एक मानली जाते. तेथील विशाल पिरॅमिड आणि जुनी मंदिरे आजही जगाला थक्क करतात. परंतु, फार कमी लोकांना माहिती आहे की, इजिप्तमध्ये एक असेही प्राचीन शहर आहे जे पिरॅमिडपेक्षाही जुने मानले जाते. या ऐतिहासिक ठिकाणाचे नाव आहे ‘हिराकोनपोलिस’, ज्याला प्राचीन काळात ‘नेखेन’ म्हणून ओळखले जायचे.

इतिहासकारांच्या मते, हे शहर सुमारे 5400 वर्षे जुने असून ते इजिप्तची पहिली राजधानी मानले जाते. याच ठिकाणी प्राचीन इजिप्तच्या सुरुवातीच्या राजांची आणि धार्मिक परंपरांची पायाभरणी झाली होती. ‘हिराकोनपोलिस’ हे शहर अप्पर इजिप्तमध्ये नाईल नदीच्या काठावर वसलेले होते. हे केवळ एक शहर नव्हते, तर त्या काळातील एक मोठे धार्मिक आणि राजकीय केंद्र होते. या ठिकाणी एक विशाल मंदिर बांधण्यात आले होते; जे गरुडाचे मुख असलेल्या ‘होरस’ देवतेला समर्पित होते. प्राचीन इजिप्तमध्ये ‘होरस’ याला शक्ती, युद्ध आणि राजसत्तेचा देव मानले जात असे. इजिप्तचे अनेक राजे स्वतःला होरसचे प्रतिनिधी मानत. यामुळेच हे मंदिर अत्यंत पवित्र आणि तितकेच रहस्यमयी मानले जात होते.

पुरातत्त्वशास्त्रज्ञांना या ठिकाणी उत्खननादरम्यान अनेक थक्क करणार्‍या गोष्टी सापडल्या आहेत. मंदिराच्या परिसरात प्राचीन शस्त्रे, मूर्ती, प्राण्यांच्या बळींचे अवशेष आणि राजांशी संबंधित चिन्हे सापडली आहेत. काही भिंतींवर आणि दगडांवर कोरलेल्या चित्रांमध्ये युद्ध, धार्मिक विधी आणि देवांच्या कथा पाहायला मिळतात. वैज्ञानिकांच्या मते, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर धार्मिक सोहळे आयोजित केले जात असत. काही तज्ज्ञांचा असाही दावा आहे की, या ठिकाणी असे काही गुप्त विधी केले जायचे, ज्यांचा थेट संबंध राजांची सत्ता आणि प्रजेमधील त्यांचा दरारा राखण्याशी होता. इतिहासकारांच्या मते, पिरॅमिड बांधले जाण्याच्या खूप आधी इथे एक सुसंघटित समाज राहत होता, जो स्वतःचे नियम आणि पूजा पद्धतींचे पालन करत प्रगती करत होता.

‘हिराकोनपोलिस’चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील अवशेष इजिप्तच्या सुरुवातीच्या संस्कृतीची कहाणी सांगतात. येथील शेती, व्यापार आणि धार्मिक प्रगतीची पातळी खूप उच्च होती, हे उत्खननातून स्पष्ट झाले आहे. आजही हे प्राचीन शहर जगभरातील संशोधक आणि पर्यटकांसाठी एक मोठे रहस्य बनून राहिले आहे. या शहराचा मोठा भाग अजूनही वाळूखाली गाडला गेलेला असून, तिथे सतत संशोधन सुरू आहे. येणार्‍या काळात या वाळूच्या ढिगार्‍याखालून आणखी काही मोठे आणि धक्कादायक खुलासे होऊ शकतात, असा विश्वास संशोधकांना आहे. म्हणूनच ‘हिराकोनपोलिस’ला इजिप्तच्या संस्कृतीचा सर्वात महत्त्वाचा आणि रहस्यमयी अध्याय मानले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news