

युकॉन : कॅनडाच्या दुर्गम ‘युकॉन’ भागात संशोधकांना एका प्राचीन विस्मयकारक रहस्याचा उलगडा करण्यात यश आले आहे. हिमयुगातील प्रागैतिहासिक खारींच्या गोठलेल्या विष्ठेमध्ये तब्बल हजारो वर्षांपूर्वीच्या महाकाय प्राण्यांचे ‘डीएनए’ सापडले आहेत. यामध्ये नामशेष झालेले लोकरी मॅमथ, एक रहस्यमय मोठी मांजर आणि इतर अनेक जीवांच्या जनुकीय खुणांचा समावेश आहे. या शोधामुळे प्राचीन काळातील परिसंस्थेचे अत्यंत सविस्तर चित्र शास्त्रज्ञांसमोर आले आहे.
शाकाहारी खारींच्या विष्ठेत मांसभक्षी प्राण्यांचे ‘डीएनए’ कसे? असा प्रश्न पडू शकतो. या खारींच्या विष्ठेत मोठ्या प्राण्यांचे जनुकीय अवशेष सापडले असले, तरी या खारी मांसभक्षी नव्हत्या. आजच्या आर्क्टिक भूमीवरील खारींप्रमाणेच (Urocitellus parryii) या प्राचीन खारीदेखील ‘संधिसाधू सर्वभक्षी’ (Opportunistic Omnivores) होत्या. त्या प्रामुख्याने विविध प्रकारच्या वनस्पती, बुरशी आणि कीटक खात असत; परंतु प्रसंगी मृत प्राण्यांचे मांस खाण्यासही त्या मागेपुढे पाहत नव्हत्या. तथापि, संशोधकांनी एक महत्त्वाची सावधगिरीही वर्तवली आहे. आर्क्टिक खारींना आपल्या बिळामध्ये आजूबाजूच्या वेगवेगळ्या वस्तू गोळा करून ठेवण्याची सवय असते. यामुळे काळाच्या ओघात त्यांच्या विष्ठेमध्ये इतर प्राण्यांचे ‘डीएनए’ मिसळले असण्याची शक्यता आहे.
याशिवाय, खारींची शिकार करण्यासाठी बिळात शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या हिंस्र प्राण्यांचे ‘डीएनए’देखील तिथे पसरले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्राचीन खारींनी मृत प्राण्यांचे मांस खाल्ले असो किंवा त्या प्राण्यांचे अवशेष केवळ आपल्या बिळात आणून ठेवले असोत, त्यांच्या विष्ठेने इतिहास उलगडण्यात मोठी मदत केली आहे. ‘बेरिंगिया’ प्रदेशाचा इतिहास येणार समोर : हा शोध ‘बेरिंगिया’ नावाच्या प्राचीन प्रदेशातील वनस्पती आणि प्राणीसृष्टी समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. शेवटच्या हिमयुगात जेव्हा आशिया आणि उत्तर अमेरिका हे खंड एका भू-मार्गाने जोडलेले होते, तेव्हा हा प्रदेश अस्तित्वात होता. या संशोधनाचे निष्कर्ष मंगळवारी (९ जून) प्रसिद्ध विज्ञान नियतकालिक ‘नेचर कम्युनिकेशन्स’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.