

वॉशिंग्टन : उत्तर अमेरिकेत राहणाऱ्या पहिल्या मानवाचा इतिहास बदलून टाकणारा एक खळबळजनक प्रागैतिहासिक शोध पुरातत्त्वशास्त्रज्ञांना लागला आहे. अमेरिकेच्या ओरेगॉन प्रांतातील पर्वतरांगांमध्ये असलेल्या ‘रिमरॉक ड्रॉ’ नावाच्या एका दुर्गम गुहेमध्ये सुमारे १८,२५० वर्षांपूर्वी मानवी वस्ती असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. हा काळ इजिप्तच्या प्रसिद्ध ‘ग्रेट पिरॅमिड'च्या वयापेक्षा तब्बल चार पट अधिक प्राचीन आहे. या शोधामुळे, सुमारे १३,००० वर्षांपूर्वी आशियातून बर्फमुक्त मार्गाने मानव पहिल्यांदा अमेरिकेत पोहोचला, या प्रदीर्घ काळापासून चालत आलेल्या 'क्लोव्हिस फर्स्ट सिद्धांताला' मोठे आव्हान मिळाले आहे. आता असे मानले जात आहे की, लोक त्याहून खूप आधी, बहुदा पॅसिफिक किनारपट्टीने प्रवास करत उत्तर अमेरिकेत आले असावेत.
ज्वालामुखीच्या राखेखाली सापडली प्राचीन हत्यारे
‘युनिव्हर्सिटी ऑफ ओरेगॉन’च्या संशोधकांना या ठिकाणी ‘ऑरेंज अगेट' या स्फटिकापासून बनवलेली दोन उत्कृष्ट मानवनिर्मित हत्यारे सापडली आहेत. ही हत्यारे माऊंट सेंट हेलेन्स ज्वालामुखीच्या १५,००० वर्षांपूर्वीच्या उद्रेकामुळे जमा झालेल्या राखेच्या थराखाली गाडली गेली होती. या हत्यारांच्या सोबतच नामशेष झालेल्या प्राचीन उंट आणि गवे (बायसन) यांच्या दातांचे अवशेषही सापडले. या दातांचे 'रेडिओकार्बन डेटिंग' केले असता, ते सुमारे १८,२५० वर्षे जुने असल्याचे स्पष्ट झाले. यातील एका हत्यारावर गव्यांच्या रक्ताचे अंशही आढळले आहेत, त्यावरून याचा वापर शिकार किंवा मांस कापण्यासाठी केला गेला असावा.
१२,००० वर्षे जुने शिवलेले कातडे आणि प्रगत तंत्रज्ञान
ओरेगॉनच्या वाळवंटी गुहांमधील कोरड्या हवामानामुळे हिमयुगाच्या शेवटच्या काळातील म्हणजेच १२,००० वर्षांपूर्वीचे प्राण्यांचे शिवलेले कातडे, विणलेल्या टोपल्या आणि लाकडी सापळे अत्यंत सुरक्षित अवस्थेत सापडले आहेत. आतापर्यंत असे मानले जात होते की, त्या काळातील मानव केवळ एक साधा शिकारी होता. परंतु, या शोधावरून असे सिद्ध होते की, पिरॅमिड बनण्याच्या हजारो वर्षे आधीच येथील मानवाकडे कपडे आणि पादत्राणे बनवण्याचे प्रगत तंत्रज्ञान व कौशल्य होते. हा शोध या भागातील आदिवासी जमातींच्या मौखिक इतिहासाशी तंतोतंत जुळणारा असून, त्यांच्या दंतकथांमधील विशालकाय प्राण्यांचे उल्लेख खरे असल्याचे यावरून स्पष्ट होते. जरी या शोधांचे वैज्ञानिक पुनरावलोकन होणे बाकी असले, तरी यामुळे अमेरिकेतील मानवी आगमनाचा कालक्रम पूर्णपणे बदलणार आहे.