

बीजिंग : चीनमधील वैज्ञानिकांनी एक अॅनालॉग तत्त्वावर आधारित नवीन चिप विकसित केली आहे. ही चिप पारंपरिक डिजिटल प्रोसेसर प्रमाणे बायनरी 1s आणि 0s ऐवजी, स्वतःच्या भौतिक सर्किटस्वर गणना करते. या चिपची निर्मिती करणार्या वैज्ञानिकांच्या मते, ही नवीन चिप Nvidia आणि AMD च्या उच्च श्रेणीतील ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिटस् (GPUs) पेक्षा तब्बल 1,000 पटीने अधिक चांगली कार्यक्षमता देऊ शकते.
‘नेचर इलेक्ट्रॉनिक्स’ जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासात, पेकिंग युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी सांगितले की, त्यांच्या उपकरणाने दोन प्रमुख अडचणी दूर केल्या आहेत... ऊर्जा आणि डेटा मर्यादा : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि 6 जी सारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये डिजिटल चिप्सना येणार्या ऊर्जा आणि डेटा मर्यादा. अॅनालॉग कॉम्प्युटिंगची समस्या : अॅनालॉग कॉम्प्युटिंगच्या मर्यादित अचूकतेची आणि अव्यवहार्यतेची ‘शंभर वर्षांपूर्वीची समस्या’. मॅसिव्ह मल्टिपल-इनपुट मल्टिपल-आऊटपुट (MIMO) सिस्टीम्स (एक वायरलेस तंत्रज्ञान प्रणाली) मध्ये वापरल्या जाणार्या मॅट्रिक्स इन्व्हर्जनसारख्या जटिल संवाद समस्यांसाठी या चिपचा वापर केल्यास, तिने प्रमाणित डिजिटल प्रोसेसरच्या अचूकतेशी जुळणारे निकाल दिले.
विशेष म्हणजे, यासाठी केवळ 100 पट कमी ऊर्जा वापरली गेली. संशोधकांनी केलेल्या सुधारणांनंतर, या उपकरणाने Nvidia H100 आणि AMD Vega 20 सारख्या टॉप-एंड जीपीयूच्या कार्यक्षमतेला तब्बल 1,000 पटीने मागे टाकले. हे दोन्ही चिप्स एआय मॉडेल प्रशिक्षणात मोठे योगदान देतात; उदाहरणार्थ, OpenAI ने ChatGPT ला प्रशिक्षित करण्यासाठी वापरलेल्या A100 ग्राफिक्स कार्डचीच H100 ही नवीन आवृत्ती आहे.
संशोधकांनी अभ्यासात नमूद केले आहे की, ‘अफाट डेटा वापरणार्या अॅप्लिकेशन्सच्या वाढीमुळे, पारंपरिक उपकरण स्केलिंग अधिकाधिक आव्हानात्मक होत असताना, डिजिटल कॉम्प्युटरसाठी हे एक मोठे आव्हान निर्माण करते.‘ ते पुढे म्हणतात, ‘बेंचमार्किंग दर्शवते की आमचा अॅनालॉग कॉम्प्युटिंग द़ृष्टिकोन, त्याच अचूकतेसाठी, अत्याधुनिक डिजिटल प्रोसेसरपेक्षा 1,000 पट अधिक थ्रुपुट आणि 100 पट चांगली ऊर्जा कार्यक्षमता देऊ शकतो.’
ही नवीन चिप रेझिस्टिव्ह रँडम-ऍक्सेस मेमरी (RRAM) सेल्सच्या अॅरेमधून बनवलेली आहे. हे सेल्स, त्यांच्यातून वीज किती सहजतेने वाहते हे समायोजित करून डेटा संग्रह आणि प्रक्रिया करतात. डिजिटल प्रोसेसर बायनरी 1 s आणि 0 s मध्ये गणना करतात, याच्या विपरित, अॅनालॉग डिझाईन तिच्या RRAM सेल्सच्या नेटवर्कमध्ये अखंड विद्युत प्रवाहाच्या स्वरूपात माहितीवर प्रक्रिया करते. डेटाची थेट तिच्या स्वतःच्या हार्डवेअरमध्ये प्रक्रिया केल्यामुळे, ही चिप बाह्य मेमरी स्रोतासोबत माहितीची देवाण-घेवाण करण्याच्या ऊर्जा-खर्चीक कामाला टाळते.