वॉशिंग्टन ः जागतिक आरोग्य संघटनेने हवेच्या खराब गुणवत्तेला जगभरातील सार्वजनिक आरोग्यासाठी सर्वात मोठा पर्यावरणीय धोका ठरवलेले आहे. इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या प्रयोगांसह अन्य काही कारणांमुळे बाहेरील हवेच्या तुलनेत घरातील हवाही अधिक खराब होत चालली आहे. शहरांमधील बहुतांश लोकांचा वेळ चार भिंतीच्या आतच जात असतो. जितका वेळ ते बाहेर राहत असतात त्यावेळीही त्यांना स्वच्छ हवा मिळत नाही. आता अमेरिकेतील बिंगहेम्टन विद्यापीठाच्या संशोधकांनी घरातील हवा स्वच्छ बनवण्यासाठी एका खास कृत्रिम रोपाची निर्मिती केली आहे. हे नकली रोप खर्या झाडांप्रमाणेच कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन हवेत ऑक्सिजन उत्सर्जित करील. तसेच त्याच्यापासून वीजनिर्मितीही होते, हे विशेष!
लेसर कटिंग तंत्राचा वापर करून 1.6 मिलिमीटर जाडीच्या मिथाईल मॅथेक्रिलेटपासून हे रोप बनवण्यात आले आहे. त्यामध्ये पाच पाने लावलेली आहेत. प्रत्येक पान सायनोबॅक्टेरिया-संक्रमित अॅनोड, एक आयन एक्सचेंज झडप आणि एका कॅथोडपासून बनवलेल्या पाच बायो सोलर सेलशी जोडलेले आहे. हे सेल सक्रिय ठेवण्यासाठी तसेच बाष्पोत्सर्जन क्रियेसाठी रोपामध्ये हायग्रोस्कोपिक लावलेला आहे. यामुळे सजीव वनस्पतीप्रमाणेच या रोपाच्या पानांमध्येही पाणी आणि पोषक घटक पोहोचवले जातात. सायनोबॅक्टेरिया पाण्यासह घरातील प्रकाश आणि कार्बन डायऑक्साईडचा वापर करून प्रकाश संश्लेषणाची क्रिया करते. या क्रियेदरम्यान इलेक्ट्रॉन्सबरोबर उत्पादित प्रोटॉनला आयन एक्सचेंज झडपेच्या माध्यमातून कॅथोडमध्ये नेले जाते.
ते कॅथोडिक प्रतिक्रिया पूर्ण करण्यासाठी हवेतील ऑक्सिजनसह क्रिया करते. ही महत्त्वपूर्ण प्रक्रिया संबंधित प्रणालीची इलेक्ट्रोन्यूट्रलिटी बनवून ठेवण्यासाठी गरजेची आहे. हे कृत्रिम रोप ऑक्सिजनबरोबरच विजेचीही निर्मिती करू शकते. यामधून सुमारे 140 मायक्रोवॅट वीज निर्माण होईल. किमान 1 मिलिवॅट विजेची निर्मिती होईल, यासाठी वैज्ञानिक प्रयत्नशील आहेत. प्रत्येक पानाच्या आतील श्रृंखलेत पाच बायो सोलर जोडून 46 मायक्रोवॅटपर्यंत विजेचे उत्पादन करता येऊ शकते. यामधून कमाल 420 मायक्रोवॅट वीज निर्मिती शक्य आहे. खर्या वनस्पतींप्रमाणेच या नकली रोपालाही खाद्य-पाणी द्यावे लागते. हे नकली रोप त्यामधूनच ऊर्जानिर्मिती करते, हे विशेष.