

भुवनेश्वर : सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओमध्ये हत्तींचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. यामध्ये हत्तीच्या अपघातांचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात असते. हत्ती जंगलातून जात असताना अनेकदा रेल्वे लाईन ओलांडतात. अशावेळी जीवघेणा अपघात होऊ शकतो. अशा अपघातापासून वाचण्यासाठी आता एआय टेक्नॉलॉजीच्या कॅमेर्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या कॅमेर्यामुळे एका हत्ती कुटुंबाचे प्राण वाचले.
ओडिशातील सुंदरगड जिल्ह्यातील राउरकेलाच्या जंगलात हत्तींच्या प्रजाती वाचवण्यासाठी मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. येथे एआय कॅमेर्यांच्या मदतीने हत्तींचे संरक्षण केले जात आहे. अलीकडे हत्तीचं कुटुंब ज्यामध्ये दोन मोठे हत्ती आणि एका पिल्लाचा समावेश आहे, रेल्वे रुळांच्या दिशेने जात होते, जिथे त्यांची समोरून येणार्या ट्रेनशी धडक होण्याचा धोका होता. परंतु एआय तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या कॅमेर्यांमुळे आणि रेल्वे विभाग आणि वनविभागाच्या सतर्कतेने हा अपघात टळला. भारतीय वन सेवेचे निवृत्त अधिकारी सुशांत नंदा यांनी त्यांच्या एक्स हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये हत्ती रेल्वे मार्गाकडे जाताना दिसत आहेत. त्याचवेळी एआय तंत्रज्ञानाने सज्ज कॅमेरा झूम करून या हत्तींना पाहिल्यानंतर लगेचच ट्रेनवर नियंत्रण ठेवण्याचा संदेश दिला. तर लोको पायलटने अत्यंत हुशारीने ट्रेन थांबवून हत्तींचा अपघातापासून वाचवले. भारतीय वन सेवेचे निवृत्त अधिकारी सुशांत नंदा यांनी त्यांच्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘एआय कॅमेर्याने ही संपूर्ण घटना आपल्या कॅमेर्यात कैद केली आहे. कॅमेर्याने हत्तींना पाहताच ताबडतोब नियंत्रण कक्षाला ट्रेन थांबवण्याचा संदेश दिला. मला हे पाहून खूप आनंद झाला की, आता आमच्याकडे यावर उपाय आहे. ट्रॅकजवळ एआय तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या चार कॅमेर्यांमुळे मोठी दुर्घटना टळली. त्यांनी पुढे माहिती दिली की, या प्रकल्पाला ‘आरएसपी’ ने त्यांच्या साइट स्पेसिफिक वन्यजीव संरक्षण योजनेतून निधी दिला आहे. जी राउरकेला वन विभागात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आली. आता कोइंझार आणि विवणा वनविभागही हे तंत्रज्ञान वापरणार आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत 3 लाख 20 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि 7 हजारांहून अधिक कमेंटस् आल्या आहेत. या तंत्रज्ञानामुळे लोकांनी वन आणि रेल्वे विभागाचे भरभरून कौतुक केले आहे.