वॉशिंग्टन : अमेरिकेतील टेक्सास या प्रांताच्या किनारपट्टी भागातील शासकीय पाणीपुरवठा योजनेमध्ये नुकताच एक अमिबा सापडला. हा अमिबा साधासुधा नसून तो चक्क मेंदूत प्रवेश करून तो कुरतडून खाऊन टाकतो. या एकपेशीय जीवामुळे नुकतेच एका सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याने तेथील प्रशासन या घातक अमिबाचा फैलाव रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना अंमलात आणू लागले आहे.
या धोकादायक अमिबाच्या प्रजातीबद्दलच्या संशोधनास सुरुवातही करण्यात आली आहे. याशिवाय टेक्सासमधील आठ शहरांतील लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच नळाद्वारे पुरवण्यात येणार्या पाण्याचा वापर करू नये, असा सल्लाही देण्यात आला आहे. टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग एबॉट यांनी सांगितले की, जॅक्सन सरोवरातून पुरवण्यात येणार्या पाण्यात हा अमिबा आढळला आहे. या एकपेशीय जीव केवळ मायक्रोस्कोपने पाहता येऊ शकतो. हा अमिबा अत्यंत वेगाने आपले प्रतिरूप तयार करतो, यामुळेच तो मानवजातीसाठी घातक ठरू शकतो.
या अमिबाचे 'नेगलेरिया फाऊलरली' असे नाव असून तो मानवी मेंदूत प्रवेश करून करतडून खाऊ शकतो. यामुळेच या अमिबासंबंधीची समस्या निकालात काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. उल्लेखनीय म्हणजे 2009 ते 2018 पर्यंत या जीवानूने त्रस्त 34 रुग्ण आढळले आहेत. ताज्या पाण्यात राहणारा हा जीव नाकावाटे मेंदूपर्यंत पोहोचतो आणि तेथे संसर्ग पोहोचवू शकतो.