

वॉशिंग्टन : तब्बल 232 वर्षांपासून अमेरिकेच्या दैनंदिन जीवनाचा भाग असलेल्या ‘पेनी’ (एक सेंटचे नाणे) चे उत्पादन बुधवारी फिलाडेल्फिया येथे थांबवण्यात आले, ज्यामुळे या नाण्याचा प्रवास संपुष्टात आला. अमेरिकेच्या ट्रेझरी डिपार्टमेंटनुसार, अनावश्यकता आणि उत्पादनाचा प्रचंड खर्च ही या नाण्याच्या समाप्तीची प्रमुख कारणे आहेत. आता ‘पेनी’ने बाजारात कोणतीही वस्तू विकत घेता येत नाही. त्यातच, एका नाण्याची निर्मिती करण्याचा खर्च तीन सेंटस्पेक्षा जास्त झाला होता. या साध्या अर्थशास्त्राने ‘पेनी’चे भवितव्य निश्चित केले.
बुधवारी दुपारी पेनसिल्व्हेनिया शहरात अंतिम ‘पेनी’ नाणी तयार करण्यात आली. युनायटेड स्टेटस्चे कोषाध्यक्ष ब्रँडन बीच यांनी अखेरचे एक-सेंटचे नाणे चलनात आणण्यासाठी छापले. मिंटच्या कार्यवाहक संचालक क्रिस्टी मॅकनॅली म्हणाल्या, ‘आज मिंट 232 वर्षांच्या ‘पेनी’ निर्मितीचा समारंभ साजरा करत आहे. आज सामान्य उत्पादन थांबले असले, तरी ‘पेनी’चा वारसा जिवंत राहील. व्यापारात त्याचा वापर कमी होत असला, तरी अमेरिकेच्या इतिहासातील त्याचे महत्त्व कायम राहील.‘पेनी’ने अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेच्या सुरुवातीच्या दिवसांपासून आतापर्यंत महत्त्वाचे कार्य केले आहे. मात्र, सध्याच्या ग्राहक वर्तनामुळे आणि आर्थिक घटकांमुळे त्याचे उत्पादन चालू ठेवणे शक्य नव्हते.
गेल्या दशकात, प्रत्येक पेनीच्या उत्पादनाचा खर्च 1.42 सेंटस्वरून 3.69 सेंटस्पर्यंत वाढला होता. हे नाणे तयार करण्यासाठी त्याच्या मूल्यापेक्षा चारपट जास्त खर्च येत होता. गेल्या वर्षी एकट्या ‘पेनी’च्या निर्मितीमुळे ट्रेझरीचे 85 दशलक्ष डॉलर्सचे नुकसान झाले होते. मे महिन्यात अमेरिकेच्या सरकारने हे नाणे कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला. ‘पेनी’चे उत्पादन थांबवल्याने ट्रेझरीची काही त्वरित बचत होऊ शकते; परंतु यामुळे ‘निकेल’ (पाच सेंटचे नाणे) या पुढील चलनाची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.