

न्यूयॉर्क : अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धापूर्वी म्हणजेच १७६४ मध्ये उभारलेले सँडी हूक दीपगृह आजही समुद्रात जहाजांना दिशा दाखवत आहे. अमेरिकेतील सर्वात जुने सलग कार्यरत असलेले दीपगृह म्हणून त्याची ओळख आहे. तब्बल २६२ वर्षांचा इतिहास असलेल्या या दीपगृहाचा प्रकाश आजही स्वच्छ हवामानात समुद्रात सुमारे १९ मैलांपर्यंत पोहोचतो. आधुनिक रडार, जीपीएस आणि अन्य तंत्रज्ञानामुळे दीपगृहांचे व्यावहारिक महत्त्व कमी झाले असले, तरी सँडी हूकचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व कायम आहे.
न्यूयॉर्कच्या बंदरात प्रवेश करण्यासाठी पूर्वी जहाजांना उथळ समुद्रभागातून अत्यंत सावधपणे मार्गक्रमण करावे लागत असे. विशेषतः, न्यू जर्सीतील सँडी हूक द्वीपकल्पाच्या उत्तरेकडील टोकाजवळ जहाजांना मोठा धोका होता. १७६१ मध्ये झालेल्या अनेक जहाज अपघातांनंतर न्यूयॉर्कमधील व्यापाऱ्यांनी दीपगृह उभारण्याची मागणी केली. त्यासाठी लॉटरीतून ७५० पौंड जमा करण्यात आले. या निधीतून चार एकर जमीन खरेदी करण्यात आली. ११ जून १७६४ रोजी १०३ फूट उंचीच्या अष्टकोनी दगडी मनोऱ्यावर पहिल्यांदा प्रकाश प्रज्वलित करण्यात आला.
अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धाला १७७५ मध्ये सुरुवात झाल्यानंतर ब्रिटिश जहाजांना न्यूयॉर्क बंदरात प्रवेश करता येऊ नये, यासाठी क्रांतिकारक सैनिकांनी दीपगृहाचा प्रकाश बंद करण्याचे प्रयत्न केले. मात्र, सहा फुटांपेक्षा अधिक जाडीच्या तळाच्या भिंतींमुळे ही वास्तू उद्ध्वस्त करणे त्यांना शक्य झाले नाही. १७८९ मध्ये अमेरिकेत दीपगृहांसाठी स्वतंत्र कायदा करण्यात आला. त्यानुसार देशातील १२ दीपगृहे राष्ट्रीय संपत्ती घोषित करण्यात आली. पुढील काळात अमेरिकेत दीपगृहांच्या उभारणीला मोठी चालना मिळाली. १८२० मध्ये देशात ५५ दीपगृहे होती; १९१० पर्यंत ही संख्या जवळपास १,४०० वर पोहोचली.
विसाव्या शतकात रेडिओ, रडार आणि जीपीएस तंत्रज्ञानाचा विकास झाल्याने दीपगृहांची गरज कमी झाली. अमेरिकेतील सुमारे ८०० दीपगृहांपैकी निम्मीच आज कार्यरत आहेत. सँडी हूक मात्र आपली ऐतिहासिक ओळख जपत आजही प्रकाश देत आहे. १९६४ मध्ये या दीपगृहाला राष्ट्रीय ऐतिहासिक महत्त्वाच्या वास्तूचा दर्जा देण्यात आला. समुद्रातील जहाजांना सुरक्षित मार्ग दाखवण्यापलीकडे दीपगृहे आशा, सुरक्षितता आणि नव्या प्रवासाचे प्रतीक मानली जातात. तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले, तरी इतिहासाची साक्ष देणाऱ्या या वास्तूंचे आकर्षण कायम असल्याचे सँडी हूक दीपगृह अधोरेखित करते.