

वॉशिंग्टन : अमेरिकेने त्यांच्या नवीन ‘फूड पिरॅमिड’ची आवृत्ती नुकतीच प्रसिद्ध केली आहे. यामध्ये अमेरिकन नागरिकांनी त्यांच्या आहारात प्रथिनांचे प्रमाण पूर्वीपेक्षा लक्षणीयरीत्या वाढवावे, अशी शिफारस करण्यात आली आहे. या नवीन बदलामुळे पोषणतज्ज्ञांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
यापूर्वीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, निरोगी प्रौढ व्यक्तीसाठी दररोज शरीराच्या प्रतिकिलो वजनामागे 0.8 ग्रॅम प्रथिनांची शिफारस केली जात असे. मात्र, नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार हे प्रमाण वाढवून आता 1.2 ते 1.6 ग्रॅम प्रतिकिलो इतके करण्यात आले आहे. जर एखाद्या व्यक्तीचे वजन 70 किलो असेल, तर जुन्या नियमानुसार तिला दिवसाला 56 ग्रॅम प्रथिनांची गरज होती. नवीन शिफारशींनुसार, त्याच व्यक्तीला आता दिवसाला 84 ते 112 ग्रॅम प्रथिनांचे सेवन करावे लागेल. टफ्टस् विद्यापीठातील पोषण विज्ञानाच्या प्राध्यापिका अॅलिस लिचटेनस्टीन यांनी या बदलावर आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यांनी सांगितले की, ‘प्रथिनांच्या शिफारशीमध्ये 50 ते 100 टक्के वाढ का करण्यात आली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.’ महत्त्वाची बाब म्हणजे, 2013 आणि 2021 मधील आकडेवारीनुसार अमेरिकन नागरिक आधीच जुन्या निकषांपेक्षा जास्त (सरासरी 1.2 ते 1.4 ग्रॅम) प्रथिनांचे सेवन करत आहेत. हा नवीन बदल काही प्रश्नही उपस्थित करतो : अधिक प्रथिने खाण्याचे खरोखर फायदे आहेत का? आणि त्याची काही कमाल मर्यादा आहे का?
यावर तज्ज्ञांनी दिलेली महत्त्वाची मते : हालचाल आवश्यक : जर तुमची जीवनशैली बैठी असेल आणि तुम्ही शारीरिकद़ृष्ट्या सक्रिय नसाल, तर प्रथिनांचे प्रमाण वाढवण्याचा विशेष फायदा होणार नाही. संतुलन महत्त्वाचे : केवळ प्रथिनांचे प्रमाण वाढवण्यासाठी आहारातील कर्बोदके (Carbs) आणि स्निग्ध पदार्थ (Fats) पूर्णपणे बंद करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. कमाल मर्यादा : दिवसाला प्रथिनांचे सेवन किती असावे, याची कोणतीही एक निश्चित जास्तीत जास्त मर्यादा अद्याप ठरवण्यात आलेली नाही. एकूणच, नवीन फूड पिरॅमिडमुळे लोकांच्या आहारातील प्रथिनांच्या महत्त्वावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.