

वॉशिंग्टन : विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात एका मोठ्या क्रांतीची नोंद झाली आहे. शास्त्रज्ञांच्या एका गटाने क्वांटम कंप्युटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून एक असे मशिन लर्निंग अल्गोरिदम विकसित केले आहे, जे आजच्या अत्याधुनिक सुपर कॉम्प्युटरलाही मागे टाकते. या यशस्वी कामगिरीमुळे भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि डेटा प्रोसेसिंगच्या पद्धतीत आमूलाग्र बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
‘नेचर फोटोनिक्स’ या प्रसिद्ध जर्नलमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात या संशोधनाचे निष्कर्ष मांडण्यात आले आहेत. शास्त्रज्ञांनी या प्रयोगासाठी एक विशेष क्वांटम फोटोनिक सर्किट आणि त्यासाठी तयार केलेला एक विशिष्ट मशिन लर्निंग अल्गोरिदम वापरला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, केवळ दोन फोटॉनच्या साहाय्याने या तंत्रज्ञानाने क्लासिकल कॉम्प्युटिंग पद्धतींपेक्षा जास्त वेग, अचूकता आणि कार्यक्षमता सिद्ध केली आहे.
शास्त्रज्ञांच्या मते, क्वांटम मशिन लर्निंगचा वापर वास्तविक जगातील समस्या सोडवण्यासाठी केला जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. या तंत्रज्ञानाचे फायदे बायनरी कॉम्प्युटरद्वारे मिळवणे शक्य नाही. याव्यतिरिक्त, त्याच्या नावीन्यपूर्ण रचनेमुळे, हे तंत्रज्ञान केवळ एका क्यूबिट असलेल्या क्वांटम कंप्युटिंग प्रणालीवर देखील लागू केले जाऊ शकते, ज्यामुळे त्याचा वापर अधिक सोपा आणि व्यापक होईल. या नवीन पद्धतीचे वैशिष्ट्य म्हणजे, वेग वाढवण्यासाठी सध्याच्या हायब्रीड क्वांटम-क्लासिकल तंत्रज्ञानाप्रमाणे ‘एन्टँगल्ड गेटस्’ची गरज लागत नाही. त्याऐवजी, हे तंत्रज्ञान ‘फोटॉन इंजेक्शन’वर अवलंबून आहे.
सोप्या भाषेत सांगायचे तर, टीमने डेटासेटमधील डेटा पॉईंटस्चे वर्गीकरण करण्यासाठी फेमटोसेकंद लेझरचा (अत्यंत कमी कालावधीसाठी प्रकाश फेकणारा लेझर) वापर बोरोसिलिकेट ग्लासवर लिखाण करण्यासाठी केला. त्यानंतर, फोटॉन सहा वेगवेगळ्या कॉन्फिगरेशनमध्ये इंजेक्ट केले गेले आणि हायब्रीड क्वांटम-बायनरी प्रणालीद्वारे त्यावर प्रक्रिया केली गेली. क्वांटम सर्किट पूर्ण करण्यासाठी फोटॉनला लागणार्या वेळेचे मोजमाप करून शास्त्रज्ञांनी क्लासिकल कॉम्प्युटिंगपेक्षा क्वांटम प्रोसेसिंग कुठे आणि किती उत्कृष्ट आहे, हे सिद्ध केले. या तुलनेतून मिळालेले निष्कर्ष क्वांटम कंप्युटिंगच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.