नवी दिल्ली : ‘एआय’ मुळे आता लोकांच्या कल्पनाशक्तीला नवे धुमारे फुटत आहेत. ‘एआय’च्या सहाय्याने इतिहासातीलही अनेक घटनांचे काल्पनिक व्हिडीओ बनवण्यात येत असतात. प्रेम आणि त्यागाचं प्रतीक अशी ओळख असणारी एक आश्चर्यकारक वास्तू म्हणजे ताजमहाल. आग्रा येथे अतिशय दिमाखात उभ्या असणार्या या संगमरवरी वास्तूनं गेली कैक वर्ष जणू इतिहासच जीवंत करून आपल्यासमोर मांडला. अशी ही वास्तू नेमकी कशी साकारली गेली, त्यासाठी किती खर्च आला यासंदर्भातील अनेक संदर्भ आजवर सांगितले गेले. आता ताजमहालच्या बांधकामाचा ‘एआय’ व्हिडिओ सोशल मीडियात आला आहे.
जगभरात आश्चर्यानं उल्लेखल्या जाणार्या या वास्तूला साकारतानाचा काळ नेमका कसा होता, कच्चा माल या वास्तूपर्यंत कसा आणला गेला हे सर्वकाही दाखवणारा एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. एका इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, एआयचा उत्तम वापर नेमका कसा करता येतो हेच या व्हिडीओच्या माध्यमातून पाहता येत आहे. कृष्णधवल छटेमध्ये असणार्या या व्हिडीओमध्ये वर्षांनुवर्षे कशा पद्धतीनं ताजमहाल साकारण्यासाठी कच्चा माल आणला गेला, कशा पद्धतीनं मोठाले संगमरवरी दगड या वास्तूच्या उभारणीसाठी रचले गेले आणि यासाठी प्राण्यांपासून मनुष्यबळाचा नेमका कसा वापर करण्यात आला याचं चित्रण व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलं आहे. तंत्रज्ञानाचा वापर केल्यास नेमकं काय आणि किती कमाल साध्य होऊ शकतं, हे हा व्हिडीओ पाहताना लक्षात येतं. जवळपास 22 वर्षे मजुरांच्या प्रचंड मेहनतीनंतर ताजमहालसारखी अद्वितीय वास्तू साकारण्यात आली आणि शतकानुशतके ही सुंदर वास्तू प्रेमाचे प्रतीक म्हणून लोकप्रिय ठरली.