AI Cancer Diagnosis | कॅन्सर निदानासाठी एआय करणार ‘मानवासारखा विचार’

AI Cancer Diagnosis |
AI Cancer Diagnosis | कॅन्सर निदानासाठी एआय करणार ‘मानवासारखा विचार’
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : कर्करोगाचे निदान करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर अधिक प्रभावी ठरू शकतो, असे नव्या संशोधनातून समोर आले आहे. तज्ज्ञ पॅथॉलॉजिस्ट रुग्णांच्या ऊतींच्या नमुन्यांमध्ये कर्करोगाची चिन्हे कशी शोधतात, त्याच पद्धतीने एआयला ‘विचार करण्याचे’ प्रशिक्षण देण्यात आले. त्यामुळे ऊतींच्या नमुन्यांचे परीक्षण करताना एआयची कार्यक्षमता सुधारल्याचे संशोधकांनी आढळून आले.

कर्करोगाच्या निदानासाठी पॅथॉलॉजिस्ट सूक्ष्म दर्शकाखाली ऊतींच्या नमुन्यांमधील पेशींचा आकार, रचना आणि त्यातील असामान्य बदल तपासतात. एखादा नमुना कर्करोगग्रस्त आहे की नाही, हे ठरवताना ते केवळ एका भागाकडे न पाहता नमुन्याच्या विविध भागांचा परस्पर संबंधही विचारात घेतात. नव्या अभ्यासात संशोधकांनी एआयला अशाच पद्धतीने ऊतींच्या स्लाइडचे परीक्षण करण्यास शिकवले. मानवी तज्ज्ञ ज्या प्रकारे संशयास्पद भाग ओळखतात आणि त्यानंतर संपूर्ण नमुन्याचा संदर्भ घेतात, त्या प्रक्रियेवर आधारित प्रशिक्षण देण्यात आले. या पद्धतीमुळे एआयला केवळ दृश्य नमुने ओळखण्याऐवजी पॅथॉलॉजिस्टच्या निदान प्रक्रियेतील काही महत्त्वाचे टप्पे समजून घेण्यास मदत झाली.

त्यामुळे कर्करोगाची चिन्हे ओळखण्याची त्याची क्षमता सुधारल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. या तंत्रज्ञानामुळे भविष्यात पॅथॉलॉजिस्टना मोठ्या संख्येने ऊतींच्या नमुन्यांची तपासणी करताना मदत मिळू शकते. विशेषतः सुरुवातीच्या टप्प्यातील कर्करोगाची संशयास्पद चिन्हे शोधण्यासाठी एआयचा उपयोग होण्याची शक्यता आहे. मात्र, एआयच्या अशा प्रणालींचा प्रत्यक्ष रुग्णांच्या निदानासाठी व्यापक वापर करण्यापूर्वी त्यांची विविध रुग्णसमूहांमध्ये आणि वैद्यकीय परिस्थितींमध्ये काटेकोर चाचणी करणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news