

लंडन : स्तनाच्या कर्करोगाचे लवकर निदान करण्यासाठी आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत घेतली जाणार आहे. ब्रिटनमध्ये (यासाठी जगातील सर्वात मोठी वैद्यकीय चाचणी सुरू करण्यात आली असून, यामध्ये देशभरातील सुमारे ७ लाख महिलांना सहभागी होण्याचे निमंत्रण दिले जाणार आहे.'एडिथ' असे या चाचणीचे नाव असून, केंब्रिज युनिव्हर्सिटी हॉस्पिटल्समधून याची सुरुवात झाली आहे. ब्रिटनमध्ये ५० ते ७१ वयोगटातील महिलांची दर तीन वर्षांनी नियमित 'मॅमोग्राम' (स्तनांचा एक्स-रे) तपासणी केली जाते. सध्या प्रत्येक मॅमोग्रामची तपासणी दोन एनएचएस तज्ज्ञांकडून केली जाते. मात्र, या नवीन चाचणीत दोन मानवी तज्ज्ञांपैकी एकाची जागा एआय प्रणाली घेणार आहे.
युकेमध्ये स्तनाचा कर्करोग हा महिलांमध्ये आढळणारा सर्वात सामान्य कर्करोग असून, दरवर्षी सुमारे ५९ हजार नवीन रुग्णांचे निदान होते. या तपासणी कार्यक्रमामुळे दरवर्षी सुमारे १,३०० महिलांचे प्राण वाचतात. एआयमुळे मानवी डोळ्यांना सहज न दिसणारे सूक्ष्म बदल टिपता येतील, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे. वॉरविक विद्यापीठाच्या प्राध्यापिका सियान टेलर-फिलिप्स यांनी सांगितले की, "एआय तंत्रज्ञानामुळे कर्करोगाचे लवकर निदान होण्यास मदत होईल; परंतु यातून अनावश्यक निदान किंवा महिलांना पुन्हा तपासणीसाठी बोलावण्याचा त्रास होऊ नये, याची आम्ही विशेष काळजी घेत आहोत."
केंब्रिज विद्यापीठाच्या प्राध्यापिका फिओना गिल्बर्ट यांच्या मते, रेडिओलॉजिस्टची मोठी कमतरता असल्याने एआयमुळे तज्ज्ञांचा वेळ वाचेल आणि त्यांना कर्करोगग्रस्त रुग्णांवर अधिक लक्ष देता येईल. या चाचणीत सहभागी होणे महिलांसाठी ऐच्छिक असेल. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ अँड केअर रिसर्चने या प्रकल्पासाठी १.१ कोटी पौंड निधी दिला आहे. प्रत्येक स्कॅनची तपासणी किमान एका मानवी तज्ज्ञाकडून नक्कीच केली जाईल, त्यामुळे रुग्णांना अचूक आणि वेगवान उपचार मिळतील, असा विश्वास ब्रिटनचे आरोग्य सचिव आणि एनएचएस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.