

बीजिंग : चीनच्या तियानजिन शहरात झालेल्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर संमेलनादरम्यान, एक महिला-सद़ृश मानवी एआय ( AI) रोबो ‘श्याओ हे’ ने आपल्या क्षमतेने सर्वांना आश्चर्य चकित केले. या रोबोला विशेषतः या संमेलनात येणार्या जागतिक नेते आणि पत्रकारांच्या मदतीसाठी तयार करण्यात आले होते. हा रोबो इंग्रजी, रशियन आणि चिनीसारख्या अनेक भाषांमध्ये सहज संवाद साधू शकतो.
एका पत्रकाराने रोबोला भारताविषयी त्याचे ‘वैयक्तिक मत’ विचारले असता, त्याने अत्यंत संतुलित आणि योग्य उत्तर दिले. श्याओ हे म्हणाला, ‘एक एआय सर्व्हिस रोबो म्हणून, मी कोणत्याही देश किंवा राजकारणाबद्दल वैयक्तिक मत देत नाही.’ त्याऐवजी, त्याने SCO शिखर संमेलनाशी संबंधित महत्त्वाची माहिती आणि आगामी कार्यक्रमांविषयी सविस्तर माहिती दिली. जेव्हा त्याला त्याच्या कामगिरीबद्दल विचारले गेले, तेव्हा त्याने आत्मविश्वासाने उत्तर दिले, ‘आज मी माझ्या सर्वोत्तम क्षमतेनुसार काम करत आहे. विचारल्याबद्दल धन्यवाद.’
पत्रकारांशी बोलताना या रोबोने स्वतःला एक ‘स्पेशल पर्पज रोबो’ असे सांगितले. हा रोबो मल्टिटास्किंग करण्यास सक्षम आहे, म्हणजे तो चिनी, इंग्रजी आणि रशियन भाषांमध्ये बोलू शकतो. तो लगेच माहितीवर प्रक्रिया करून अचूक उत्तरे देऊ शकतो. प्रोटोकॉलनुसार, तो केवळ मर्यादित विषयांवरच बोलू शकतो. श्याओ हे व्यतिरिक्त, आणखी एका रोबोने मीडिया सेंटरमध्ये स्वयंसेवकांना आईस्क्रीम दिले. हे दर्शवते की चीनने हे संमेलन अधिक आधुनिक बनवण्यासाठी तंत्रज्ञानाचा भरपूर वापर केला.