

नवी दिल्ली : गूगलने आपल्या जगप्रसिद्ध जी-मेल सेवेत जेमिनीद्वारे संचालित नवीन एआय फीचर्स आणण्याची घोषणा केली आहे. यामुळे कोट्यवधी यूजर्सचा ई-मेल वापरण्याचा अनुभव आणि पद्धत पूर्णपणे बदलणार आहे.
एआय ओव्हरव्ह्यू : जेव्हा तुम्ही अनेक उत्तरांचे (थे्रडस) मोठे ई -मेल संभाषण उघडता, तेव्हा एआय तुम्हाला त्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांचा थोडक्यात सारांश (समरी) देईल. यामुळे तुम्हाला प्रत्येक ई-मेल वाचण्याची गरज पडणार नाही.
नवीन एआय इनबॉक्स : गूगल एका नवीन एआय इनबॉक्सची चाचणी घेत आहे. हा इनबॉक्स तुमच्या संपर्कातील महत्त्वाच्या व्यक्ती (व्हीआयपी) आणि कामाच्या ई-मेलना प्राधान्य देईल. उदाहरणार्थ, बिले भरणे किंवा डॉक्टरांची अपॉईंटमेंट यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टी तो आपोआप हायलाईट करेल.
हेल्प मी राईट (मला लिहिण्यास मदत करा): हे टूल आता सर्व यूजर्ससाठी मोफत उपलब्ध करून दिले जात आहे. तुम्ही फक्त एखादा छोटा प्रॉम्प्ट (उदा. “सुट्टीसाठी अर्ज लिहा”) दिल्यास, एआय तुमच्यासाठी पूर्ण ई-मेल मसुदा तयार करून देईल.
सजेस्टेड रिप्लाय (सुचवलेली उत्तरे) : एआय आता संभाषणाचा संदर्भ समजून तुम्हाला उत्तरांचे पर्याय सुचवेल. हे पर्याय तुमच्या लिहिण्याच्या पद्धतीशी जुळणारे असतील.
सर्व यूजर्ससाठी : ई-मेल समरी, हेल्प मी राईट आणि सजेस्टेड रिप्लाय ही फीचर्स मोफत असतील.
पेड सबस्क्राइबर्ससाठी (गूगल एआय प्रो/अल्ट्रा) : इनबॉक्स क्वेश्चन्स (इनबॉक्सला प्रश्न विचारणे), प्रूफरीड (व्याकरण आणि टोन तपासणे) ही प्रगत फीचर्स केवळ पैसे देणार्या सदस्यांसाठी असतील.
डेटा प्रायव्हसी : गूगलने स्पष्ट केले आहे की, वापरकर्त्यांचा खासगी ई-मेल डेटा त्यांच्या एआय मॉडेल्सना प्रशिक्षित (टे्रन) करण्यासाठी वापरला जाणार नाही. हे सर्व एआय प्रोसेसिंग सुरक्षित आणि खासगी वातावरणात केले जाईल.