

रोम : इसवी सन ७९ मध्ये माऊंट विसुवियस ज्वालामुखीच्या भीषण उद्रेकात गाडल्या गेलेल्या पॉम्पेई शहरात संशोधकांनी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी पहिल्यांदाच कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून, या आपत्तीत मृत्यू पावलेल्या एका व्यक्तीचा चेहरा डिजिटल स्वरूपात पुन्हा जिवंत केला आहे.
शेवटच्या क्षणांचा थरार ‘एआय’च्या चित्रात कैद
पॉम्पेई पुरातत्त्व विभागाने जाहीर केलेल्या या चित्रात एक पुरुष ढिगाऱ्यांनी भरलेल्या रस्त्यावरून धावताना दिसत आहे. विशेष म्हणजे, डोक्यावर पडणाऱ्या ज्वालामुखीच्या दगडांपासून वाचण्यासाठी त्याने एक मोठी मातीची परात ढालीप्रमाणे धरली आहे. पाठीमागे माऊंट विसुवियस ज्वालामुखीतून धूर आणि आग बाहेर पडताना दिसत आहे.
कसा साकारला हा चेहरा?
इटलीतील 'युनिव्हर्सिटी ऑफ पाडुआ' आणि पॉम्पेई पुरातत्त्व पार्क यांनी संयुक्तपणे हे काम केले. पोर्टा स्टॅबिया स्मशानभूमीजवळ उत्खननात सापडलेल्या मानवी अवशेषांच्या सांगाड्याचा अभ्यास करून आणि पुरातत्त्वीय माहिती एआयच्या अल्गोरिदममध्ये टाकून हा वास्तववादी चेहरा तयार करण्यात आला. या व्यक्तीजवळ एक तेलाचा दिवा, लोखंडी अंगठी आणि १० कांस्य नाणी सापडली होती, ज्यावरून त्या काळातील सामान्य जीवनाचा अंदाज येतो.
चित्र तयार करताना साहित्याचा आधार घेण्यात आला. लेखक 'प्लिनी द यंगर' यांच्या ऐतिहासिक नोंदींमध्ये असे नमूद आहे की, ज्वालामुखीचा उद्रेक झाला तेव्हा लोक स्वतःचे संरक्षण करण्यासाठी उशी किंवा इतर वस्तू डोक्यावर धरून धावत होते. संशोधकांना सापडलेली ही व्यक्तीदेखील अशाच प्रकारे आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे पुराव्यांवरून स्पष्ट झाले आहे.
पॉम्पेई पार्कचे संचालक गॅब्रिएल झुचट्रिएगेल यांनी सांगितले की, ‘पुरातत्त्व क्षेत्रातील अफाट माहितीचे विश्लेषण करण्यासाठी आता कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत अनिवार्य झाली आहे. यामुळे इतिहास केवळ पुस्तकात न राहता लोकांसमोर सजीव रूपात मांडणे शक्य होईल.’ या प्रयोगामुळे इतिहासातील एका भीषण नैसर्गिक आपत्तीचा मानवी दृष्टिकोनातून अभ्यास करणे आता अधिक सोपे होणार आहे.