

जिनिव्हा : मानवी नियंत्रणाशिवाय काम करणाऱ्या 'स्वायत्त शस्त्रांवर' वेळीच कायदेशीर नियंत्रण न आणल्यास, बाटलीतून बाहेर पडलेल्या या राक्षसाला पुन्हा आत घालणे अशक्य होईल,असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. येथे नुकत्याच पार पडलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस समिती आणि मानवाधिकार संघटनांनी हा गंभीर इशारा दिला आहे.
स्वायत्त शस्त्रे म्हणजे अशी लष्करी यंत्रणा जी कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा रोबोटिक्सच्या मदतीने मानवी हस्तक्षेपाशिवाय स्वतःहून लक्ष्याचा वेध घेतात. रशिया-युक्रेन युद्धात शेवटच्या टप्प्यात स्वतः निर्णय घेणारे ड्रोन आणि गाझामध्ये लक्ष्य निश्चित करण्यासाठी एआयचा वापर आधीच सुरू झाला आहे. तज्ज्ञांच्या मते, जर या शस्त्रांना मोकळे रान मिळाले, तर खासगी कंपन्या आणि लष्कर स्वतःचे नियम बनवतील, जे मानवतेसाठी घातक ठरेल.
नागरिकांवर होणारे गंभीर परिणाम
या तंत्रज्ञानाचे भयावह परिणाम आतापासूनच दिसू लागले आहेत. युक्रेनच्या झापोरिझिया येथे एका रशियन एआय-आधारित ड्रोनने चुकीच्या दिशेने जाऊन तीन सामान्य नागरिकांचा बळी घेतला. इराणमध्ये एआयच्या सदोष माहितीमुळे अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात १२० शालेय मुलांसह १५६ नागरिकांना जीव गमवावा लागला. तसेच, गाझामध्येही एआयमुळे अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेल्याचे मानवाधिकार संघटनांचे म्हणणे आहे. 'फ्युचर ऑफ लाईफ इन्स्टिट्यूट'च्या ॲना हेहिर यांनी इशारा दिला आहे की, भविष्यात हजारो ड्रोनचे थवे एकत्र हल्ला करतील आणि एका तांत्रिक चुकीमुळे मोठा नरसंहार होऊ शकतो. केवळ प्रगत देशच नव्हे, तर येमेनमधील हुथी बंडखोर आणि आफ्रिकेतील दहशतवादी गट देखील क्षेपणास्त्रे आणि ड्रोन विकसित करण्यासाठी एआय साधनांचा वापर करत आहेत.
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस आणिआयसीआरसीने मानवांना लक्ष्य करणाऱ्या स्वायत्त शस्त्रांवर पूर्ण बंदी घालण्याची मागणी केली आहे. या परिषदेत पुढील दोन वर्षांत नियम बनवण्याबाबत चर्चा करण्याचे ठरले असले, तरी हा वेग अपुरा आहे. यंत्रांनी माणसाचा जीव घेण्याचा निर्णय घेणे ही एक नैतिक 'लक्ष्मणरेषा' असून, ती ओलांडली जाण्यापूर्वीच जागतिक स्तरावर कठोर कायदा होणे अत्यंत गरजेचे आहे.