AI Technology : एआय संचालित रोबो चीनमध्ये ‘मास प्रॉडक्शन’साठी सज्ज

लवकरच घरकामात करणार मदत
AI Technology
एआय संचालित रोबो चीनमध्ये ‘मास प्रॉडक्शन’साठी सज्ज
Published on
Updated on

बीजिंग : चिनी तंत्रज्ञान कंपनी ‘एक्सपेंग’ने विकसित केलेला, माणसासारखाच हुबेहूब दिसणारा ‘ह्युमनॉईड रोबो’ आता व्यावसायिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर निर्मितीसाठी सज्ज झाला आहे. स्वतः चालत उत्पादन लाईनच्या बाहेर पडणारा हा जगातील पहिलाच असा रोबो ठरेल, असा दावा कंपनीच्या प्रतिनिधींनी केला आहे.

या रोबोला कापडी त्वचा बसवण्यात आली असून तो वेगवेगळ्या शरीराच्या आकारात आणि लिंगांमध्ये उपलब्ध असेल. या रोबोची उंची ५ फूट ७ इंच (१७३ सें.मी.) असून वजन ६५ किलोग्रॅम आहे. डोक्यापासून पायापर्यंत यामध्ये तब्बल ८२ डिग्रीज ऑफ फ्रीडम (DoF) देण्यात आले आहेत, ज्यापैकी प्रत्येक हातात २२ DoF आहेत. यामुळे तो मानवाप्रमाणेच नाजूक हालचाली करू शकतो. हा रोबो ताशी जवळपास ७.२ कि.मी. (२ मीटर प्रतिसेकंद) वेगाने चालू शकतो, जो माणसाच्या जलद चालण्याच्या वेगाएवढा आहे. रोबोची बॅटरी कमी झाल्यावर तो स्वतःहून निश्चित केलेल्या चार्जिंग स्टेशनचा शोध घेतो आणि प्लग-इन होतो.

गेल्यावर्षी एका कार्यक्रमात सादरकर्त्यांनी या रोबोला थेट स्टेजवर कापून दाखवले होते, जेणेकरून त्याच्‍या आत कोणताही माणूस बसलेला नाही, हे सिद्ध व्हावे. या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. आता एक्सपेंग कंपनी आपल्या विद्यमान उत्पादन केंद्रांमधूनच या रोबोंची निर्मिती करणार आहे. कंपनीच्या प्रतिनिधींनुसार, हा रोबो भविष्यात घरांमध्ये साफसफाई करणे, कपड्यांच्या घड्या घालणे यासारख्या दैनंदिन कामांमध्ये मदत करेल. २००० च्या दशकाच्या मध्यकाळात जशी स्मार्टफोनची क्रांती झाली, तशीच रोबोंची क्रांती येत्या काही वर्षांत पाहायला मिळेल आणि हे रोबो घरोघरी पोहोचतील, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. हा रोबो तोंडी सूचना स्वीकारू शकतो, स्वतःची रणनीती आखू शकतो आणि आजूबाजूच्या अडथळ्यांचा अंदाज घेऊन सुरक्षितपणे हालचाल करू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news